मुंबई: जर तुम्ही दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुम्हाला सराफाला 1 टक्का टीसीएस कर द्यावा लागणार आहे. यापूर्वी 5 लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर टीसीएस कर द्यावा लागत होता. मात्र रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यासाठी सरकार 1 एप्रिलपासून नवीन करनियमाची अंमलबजावणी करणार आहे.
विशिष्ट किंमतीच्या वस्तू खरेदीनंतर ग्राहकाकडून दुकानदाराला देण्यात येणारी कराची रक्कम म्हणजे टीसीएस, अर्थात टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स. 2017च्या वित्त विधेयकाच्या मंजुरीनंतर टीसीएसच्या वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राप्तीकर विभाग १ जुलै २०१२ पासून सोन्याच्या दोन लाखांवरील आणि दागिन्यांच्या पाच लाखांवरील रोखीतील खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे. आता हा कर लागू करण्यासाठी दागिन्यांच्या रोखीतील खरेदीचीही मर्यादा दोन लाखांवर आणण्यात आली आहे. तशी तरतूद वित्त विधेयक २०१७ मध्ये करण्यात आली आहे.