रायबरेली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या आहेत. राजकीय नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरु असतानाच समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि यूपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांनाच खेचलं आहे. गुजरात टुरिझमबाबत बिग बींच्या जाहिरातीचा संदर्भ घेत अखिलेश यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

'सध्या गुजरातमधील गाढवांची एक जाहिरात येत आहे. मी या घडीच्या सर्वात मोठ्या सुपरस्टारला (अमिताभ) विनंती करेन की त्यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार थांबवावा' असा टोला अखिलेश यांनी हाणला. कवितेच्या माध्यमातून अखिलेश यांनी ही टीका केली.

अमिताभ बच्चन गेल्या काही काळापासून गुजरात पर्यटनाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. बिग बींच्या नव्या जाहिरातीत त्यांच्यासोबत गुजरातमधील काही गाढवं दिसत आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कच्छच्या रणामधील जंगली गाढवांविषयी अमिताभ या जाहिरातीत सांगतात. जनतेच्या पैशातून अखिलेश जाहिरातीवर खर्च करत असल्याचा आरोप मोदींनी केला होता, त्यावर अखिलेश यांनी उत्तर दिलं आहे.

'पंतप्रधानांनी मन की बात थांबवण्याची वेळ आली आहे. त्यांनी महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं' असं अखिलेश यादव रायबरेलीतील सभेत म्हणाले. 'मोदींच्या मनात गंगा नदीविषयी अपार श्रद्धा आहे. त्यांनी गंगेची शपथ घेऊन सांगावं की वाराणसीला 24 तास विद्युत पुरवठा मिळेल की नाही' असा सवाल अखिलेश यांनी विचारला आहे.