बुलढाणा: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावर आधारित जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील ऑक्टोबर महिन्यातील रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात आली.  त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या रँकिंगमध्ये चक्क केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा जिल्हाच पिछाडीवर असून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी चक्क आपल्या कामगिरीमध्ये शेवटच्या स्थानी झळकून आले आहेत.


राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातर्गत  रँकिंग जाहीर


राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मातृ स्वास्थ, मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, किशोरवयीन आरोग्य, आशा कार्यक्रम, प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुपोषण अशा सेवा निर्देशांकाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आधीन असलेल्या संस्थांमध्ये  प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी केली होती. यात बुलढाणा जिल्हा अतिशय शेवटच्या स्थानी आढळून आला आहे. ऑक्टोबर 2024 ची रँकिंग जाहीर झाली असून यात वाशिम जिल्हा सर्वप्रथम तर नाशिक जिल्हा द्वितीय तर ठाणे जिल्हा तृतीय स्थानावर आढळून आले आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा जिल्हा सगळ्यात शेवटच्या स्थानी


केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाऊन असलेला बुलढाणा जिल्हा मात्र राज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निर्देशांकात अतिशय शेवटच्या स्थानी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुपोषणाचे थैमान सुरू आहे.


शालेय पोषण आहारातील विषबाधा प्रकरणात मुख्याध्यापक निलंबित 


वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील 57 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. शालेय पोषण आहाराच्या अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर तेल, मीठ हे पदार्थ खाण्यास योग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यपकाना आता निलंबित करण्यात आले आहे. 57 विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आल्यावर उलटी, ताप, मळमळ, पोटदुखी असे प्रकार झाल्याने विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आमदार समीर कुणावार तसेच जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी या प्रकरणाची पळताळणी केली.  शाळेचे मुख्याध्यापक अरुण पोहाणे हे कर्तव्यात कसूर करीत असल्याचे यात आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या