राज्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारचा निरोप घेऊन सदाभाऊ पुणतांब्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
"या सोन्याच्या लंकेत रामाची सिता असेल, तर आपणच मागणी करत होतो तिथे हनुमानाला पाठवावं लागेल. तुम्ही बसलेले सगळे राम आहात, मी लहानसा हनुमान म्हणून सीतेच्या शोधाला गेलो आहे. यापेक्षा जास्त काम माझं नाही. तुमची सीता कुठं आहे हे दाखवण्याचं काम माझं आहे, तुमच्यासोबत लढण्याचं कामही माझं आहे", असं सदाभाऊ म्हणाले.
सदाभाऊंची मध्यस्थी फळाला
सदाभाऊ खोत यांनी पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी केलेली मधस्ती फळाला येण्याची चिन्हं आहेत. कारण संपाचं हत्यार उपसलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेचा प्रस्ताव मान्य केला आहे.
आज संध्याकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदाभाऊंच्या आमंत्रणाला शेतकऱ्यांनी हा प्रतिसाद दिला आहे. मात्र या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास 1 जूनपासून आम्ही संपावर जाऊ असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारचं धाबं दणाणलं आहेत. त्यामुळे पणनमंत्री सदाभाऊ खोत यांना मध्यस्थीसाठी पुणतांब्याला पाठवण्यात आलं. यानंतर सदाभाऊंनी पुन्हा शेतकऱ्यांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं.
मुख्यमंत्र्यांचा कालचा चर्चेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा, शेतमालाला हमीभाव द्यावा, यासह अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यासाठी शेतकरी 1 जूनपासून संपावर जाण्याच्या विचारात आहेत.