चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मानव तस्करीचं एक खळबळजनक प्रकरण उजेडात आलं आहे. 2010 मध्ये एका 11 वर्षीय मुलीचं चंद्रपूर शहरातून अपहरण करण्यात आलं होतं. तब्बल 10 वर्षांनंतर हरियाणातील फतेहाबादमधून या मुलीची सुटका करण्यात आली. अपहरणानंतर तब्बल 7 वेळा या मुलीची विक्री करण्यात आली. यादरम्यान तिच्यावर मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचारही झाले. तर अत्याचाराच्या परिसीमेने मुलगी दोन मुलांची आई देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. पीडित मुलीला हरियाणा राज्यातील फतेहाबादमध्ये एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. या घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती देत मुलीची सुटका केली. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या तस्करीचं एक मोठं रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात येण्याची शक्यता आहे.


या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथे काही दिवसांपूर्वी घरात डांबून ठेवलेल्या एका महिलेची स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली होती. धर्मवीर नावाच्या इसमाने तिला एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते. मात्र घर मालकाला या मुलीच्या वर्तनाचा संशय आल्याने त्याने विचारपूस करताच खरा प्रकार उजेडात आला. या घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती देत मुलीची सुटका केली.

दरम्यान हरियाणा पोलिसांनी यासंबंधीचा मूळ गुन्हा शोधून काढला आणि या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. सुटका करण्यात आलेली मुलगी मूळची चंद्रपूर शहरातील आहे. चंद्रपूर शहरातील एका मंदिराच्या प्रांगणातून 2010 साली अकरा वर्षाच्या या मुलीचे आरोपींनी प्रसादातून गुंगीचे औषध देत अपहरण केले. या मुलीला तातडीने हरियाणा राज्यातील पानीपत येथे नेत तिची विक्री केली गेली. शेतावरील एका घरात तिला डांबून ठेवण्यात आले. खरेदी केलेल्या इसमाच्या मुलांनी या कोवळ्या जीवावर सतत अत्याचार केले.

अजाणत्या वयात या मुलीचा तब्बल सात वेळा सौदा झाला तर अत्याचाराच्या परिसीमेने मुलगी दोन मुलांची आई देखील झाली. विक्रीच्या निमित्ताने तिला हरियाणातील विविध शहरात ठेवले गेले. हे प्रकरण सातत्याने सुरू असताना हरियाणा राज्यातीलच फतेहाबाद येथे सातव्यांदा तिला धर्मवीर नावाच्या इसमाला विकण्यात आले. मात्र घरमालकाच्या समयसूचकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात हा गुन्हा दाखल असल्याने रामनगर पोलिसांच्या पथकाने फतेहाबाद गाठून या मुलीला चंद्रपुरात परत आणले आहे. रामनगर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली असून या मागे रॅकेट मोठे असल्याचा पोलिसांना संशय आहे.