HMPV Virus India: जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे. भारतात देखील आतापर्यंत तीन जणांना HMPV व्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातील दोन जणांना HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता गुजरातमधील 2 वर्षांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. गुजरातमध्ये एका 2 वर्षाच्या मुलामध्ये हा एचएमपीव्ही विषाणू आढळून आला आहे. संबंधित मुलाला अहमदाबादच्या चांदखेडा परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत एकूण तीन जणांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण झालेली आहे. भारतात आढळलेल्या तिन्ही रुग्णांमधला विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती मिळत आहे.


एचएमपीव्ही व्हायरसचा भारताला फारसा धोका नाही- डॉ. रवी गोडसे


एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.


कोरोना आजारासारखी दिसतात लक्षणे- 


एचएमपीव्हीच्या संसर्गात सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात. खोकला, ताप येतो, सर्दी होते. ह्यूमन मेटाप्रोन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा मेटाप्रोन्युमोव्हायरस जीन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या बाधेमुळे लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वांत जास्त त्रास होतो. या आजारांमुळे चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास, मास्क घालण्यास व हात सॅनिटाईझ करण्यास सांगितले आहे. एचएमपीव्ही विषाणूमुळे झालेला संसर्ग बरा करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.


सावधान, HMPV व्हायरसपासून वाचण्यासाठी हे करा :


- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.


- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.


- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.


- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा


- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.


हे करू नये :


- हस्तांदोलन


- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर


- आजारी लोकांशी जवळचा संपर्क


- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे




संबंधित बातमी:


HMPV चा पहिला रुग्ण आढळला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री आबिटकरांनी बोलावली महत्त्वाची बैठक!