हिंगोली : डेंग्यू झालेल्या रुग्णाला सहा लाखांचे बिल पाठवले, त्याला काय अमृत पाजलं का असा शब्दात शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी डॉक्टरांना फैलावर घेतलं. रुग्णाची कंडिशन कशीही असो, पण सहा लाखांचे बिल देऊन त्यांना लुटू नका असंही ते म्हणाले. या संबंधी एक ऑडिओ कॉल व्हायरल होत आहे. एबीपी माझा या व्हायरल ऑडिओ क्लिपची कोणतीही पृष्ठी करत नाही. 

हिंगोली जिल्ह्यातील आदिती सरकटे यांच्यावर डेंग्यू झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांना एकूण सहा लाखांचे बिल देण्यात आले.डेंग्यूच्या रुग्णाला एवढे बिल कसे काय असा प्रश्न करत संतोष बांर यांनी डॉक्टरांना चांगलंच झापलं. सहा लाखांचे बिल केला, तुम्ही रुग्णाला काय अमृत पाजला का असा प्रश्नही त्यांनी विचारला.  

काय म्हणाले संतोष बांगर? 

डॉक्टरांशी फोनवर बोलताना संतोष बांगर म्हणाले की, रुग्णाला तीन लाखांचे मेडिकल बिल आणि दोन लाख 85 हजारांची फी लावण्यात आली आहे. त्यांनी एक लाख 80 हजारांचे बिल भरलंय. डेंग्यूच्या रुग्णाला एवढं बिल लावतात का? 

त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्ण भरती झाला त्यावेळी गंभीर होता. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायला लागलं. त्यामुळेच एवढं बिल झालं. त्यावर आपला भाऊ एमबीबीएस एमडी आहे, तुम्ही खोटं बोलू नका असं आमदार संतोष बांगर म्हणाले. 

एवढं मोठं हॉस्पिटल लोकांना लुटण्यासाठी बांधलंय का? असा प्रश्न संतोष बांगर यांनी विचारला. गोरगरिबाला लुटू नका, हात जोडून तुम्हाला विनंती करतो असं संतोष बांगर म्हणाले. या पद्धतीने जर तुम्ही दवाखाना चालवणार असाल तर आम्हालाही अॅक्शन घेण्याचा अधिकार आहे असा इशाराही संतोष बांगर यांनी दिला.