Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरात थैमान घालणारा जनावरांमधील लम्पी (Lumpy) आजाराचा प्रादुर्भावकमी झाला आहे. मात्र असे असलं तरीही काही जिल्ह्यात अजूनही बाधित जनावरे आढळून येत आहे. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात लम्पी आजाराला थोडा ब्रेक बसला असला तरीही, अजूनही बाधित जनावरे आढळून येत आहेत. यात आतापर्यंत यात 35 गाई, 43 बैल तर 107 वासरांना आपला जीव गमवावा लागला. तर अजूनही 568 जनावरे सक्रीय  असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात लम्पी आजाराला थोडा ब्रेक बसला असला तरी पशुसंवर्धन विभागाचे पथक गावात जाऊन जनावरांची तपासणी करीत असल्याने बाधित जनावरे समोर येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 366 गावांमध्ये लम्पी आजार पसरला असून 3274 बाधित जनावरे आढळून आली. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बाधित जनावरांवर उपचार करण्यात येत असल्याने 2521 जनावरे बरी झाली आहेत. सध्या 538 जनावरे बाधित असून यातील 20 जनावरे गंभीर आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आतापर्यंत दोन लाख 38 हजार 653 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ...

राज्यातील लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही एकट्या हिंगोली जिल्ह्यात अजूनही 568 जनावरे सक्रीय असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे जनावरांना अजूनही लम्पीचा धोका असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर अनेकदा लसीकरण केल्यावर देखील जनावरांना लम्पीची लागण होत आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत असताना आता लम्पीचा धोका देखील काही कमी होताना दिसत नाही. 

थंडीचाही फटका 

दरम्यान राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर तापमानात देखील मोठी घट झाली आहे. याचा परिणाम लम्पीमुळे (Lumpy Virus) ग्रासलेल्या जनावरांवर होत असून, कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होताना पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी जनावारांध्ये फूट अॅन्ड माऊथ डिसीज अर्थात तोंडखुरी आणि पायखुरी असे विषाणूजन्य आजार बळावत असल्याने, लम्पीसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.

लम्पी आकडेवारी (हिंगोली) 

अ.क्र. लम्पी माहिती  आकडेवारी 
1 बाधित गावे  366
2 एकूण बाधित जनावरे  3274
3 एकूण लसीकरण  238653
4 एकूण बरे झालेली जनावरे  2521
5 सक्रीय जनावरे  568

इतर महत्वाच्या बातम्या: 

Soyabean Price : सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघणं कठीण; शेतकरी संकटात