हिंगोली : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांकडून भव्य सभा देखील घेतल्या जात आहे. आता, हिंगोली जिल्ह्यात देखील या दोन्ही नेत्यांची एकामागून एक सभा होणार आहे. 26 नोव्हेंबरला छगन भुजबळ यांची रामलीला मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मनोज जरांगे यांची देखील हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे फाट्यावर 110 एकरवर सभा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभेकडे हिंगोलीसह राज्याचे लक्ष लागले आहेत.


पहिली सभा भुजबळांची...


ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्यातील ओबीसी नेते हजेरी लावणार असल्याचे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. ज्यात, उ‌द्घाटक अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तर अध्यक्षस्थानी प्रकाश शेंडगे राहतील. तर, ओबीसींच्या या एल्गार महामेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सर्कलनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यात ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांनी यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, अंबड येथील सभेनंतर मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रत्येक टीकेला भुजबळ हे याच सभेतून उत्तर देणार असल्याची देखील चर्चा आहे. सोबतच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांच्या सभेत यापुढे आपण नसणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये पडलेल्या फुटीवर देखील भुजबळ काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


मनोज जरांगेंची सभा 110 एकरवर 


एकीकडे भुजबळ यांच्या 26 तारखेच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असतांना, दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या देखील सभेची हिंगोलीत जोरदार तयारी सुरु आहे. जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. हा टप्पा 23 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे, पुढे जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. याच चौथ्या टप्प्यात जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहे. हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे या फाट्यालगत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी तब्बल अडीचशे एकर शेत जमीनवर तयारी सुरू करण्यात आली आहे. या तयारीसाठी तब्बल आठ ते दहा जेसीबी, दहा ट्रॅक्टर यासह अनेक मराठा समाज बांधव दिवस काम करत आहे. या ठिकाणी 110 एकरवर सभा होणार असून, उर्वरित दीडशे एकर जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी सभेची तयारी मात्र जोरदार स्वरूपात सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : 'शांत राहूनही आमच्यावर गुन्हे ठोकतायत'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल