हिंगोली: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असून आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. नहाद गावातील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय गोविंद कावळे या तरुणाने चिठ्ठी लिहत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं.
आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत म्हटलंय की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातंय. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्याकडून तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तरीही या विषयावरून होणाऱ्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे.
परभणीत आणखी एक आत्महत्या
मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळत नसल्यामुळे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. जिंतुर तालुक्यातील बोर्डी येथील 39 वर्षीय बापुराव उत्तमराव मुळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातायत. त्यातच मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत परभणीमध्येही साखळी उपोषण सुरु करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
बापुराव मुळे हे अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित होते. तेव्हापासून बापुराव हे आरक्षण मिळावे असे म्हणत होते. त्यांना तीन मुले असून ती शिक्षणात हुशार आहेत.आरक्षण मिळत नसल्याने बापुराव मुळे यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी बोरी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग गोफणे, तहसीलदार सरोदे, सह पोलीस निरीक्षक. सरला गाडेकर, पोलीस उप निरीक्षक अनिल खिल्लारे यांनी भेट दिली. दरम्यान तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबालाही भरीव मदत करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: