हिंगोली : एकट्या छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) ऐकून तुम्ही जर मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा. महाराष्ट्राचे आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. छगन भुजबळांचे ऐकून जर मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज हिंगोलीतून (Hingoli) शांतता रॅलीला (Shantata Rally) सुरुवात केली आहे. या रॅलीतून त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.

  


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज मन भरून आले आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो.  हिंगोलीच्या मराठ्यांनी मराठ्यांची शान राखली आहे. ज्या ज्या वेळी मराठ्यांवर संकट येतील, त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीने उभा राहील. माझं राज्य सरकारला जाहीर सांगणे आहे की, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय.


...तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही


एकट्या छगन भुजबळचे ऐकून तुम्ही जर मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा. महाराष्ट्राचे आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. छगन भुजबळांचे ऐकून जर मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही. सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, आक्रोश समजून घ्या. आज कानाकोपऱ्यात भगवे वादळ दिसत आहे.  छगन भुजबळचे ऐकून त्रास दिला तर तुम्हाला पुन्हा त्रास होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 


सरसकट आरक्षण द्यायचं जबाबदारी तुमची


ते पुढे म्हणाले की, मला राजकारणात जायचं नाही.  मराठ्यांना आरक्षण मिळावं. करोडो मराठा समाजाचे लेकर मोठी झाली पाहिजेत. मराठा कुणबी एकच आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सरसकट आरक्षण द्यायचं ही जबाबदारी तुमची आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करायची आणि टिकवायची जबाबादारी तुमची आहे. माळी समाजाला आरक्षण दिलं. बाकीच्या जाती पोट जाती म्हणून घातल्या. विदर्भातील मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. आमचा व्यवसाय आणि जात एकच आहे. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. पश्चिम महाराष्ट्रातील सगळं मराठा कुणबी आहेत. 57 लाख नोंदी सापडल्याचे लेखी दिलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र का देत नाहीत?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.  


मराठे शांत आहेत तोवर आहेत, नाहीतर विधानसभेला दाखवतो


मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे, मुलं शिकवायचे आणि नोकरी लागत नाही.  13 तारखेला आरक्षण दिलं नाही तर आपली बैठक मुंबईला होण्याची शक्यता आहे. मराठे शांत आहेत तोवर आहेत, नाहीतर विधानसभेला दाखवतो.  अंतरवालीमध्ये आपलं आंदोलन सुरू असताना समोर आंदोलन सुरू केले.  गोरगरीब ओबीसींच्या अंगावर जायचं नाही. मराठ्यांच्याही अंगावर जाऊ नका. भुजबळ जेलमध्ये जाऊन आला. त्याला वाटतं सर्व मराठ्यांनी जेलमध्ये जावं, अशीही टीका मनोज जरांगे पाटलांनी यावेळी केली आहे.