Continues below advertisement

हिंगोली : मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे, यापुढे आम्ही दांडकं नाही तर कोयते काढू असा इशारा लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला. बंजारा समाजानेही आता वेगळं आरक्षण न मागता ओबीसींची (OBC Reservation) एकजूट राखावी, कुणीही ओबीसींमध्ये फूट पडेल असं कृत्य करू नये असं आवाहन हाकेंनी केलं. हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारा आहे. मुख्यमंत्र्यावर आमचा विश्वास आहे, ते जीआर मागे घेतील असं लक्ष्मण हाके म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी हा विद्रोह आहे. आमच्या हक्काचं ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय. आता हातामध्ये दांडकं नाही तर कोयते घेऊ असा इशारा त्यांनी दिला.

Continues below advertisement

ओबीसींमध्ये फूट नको

हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू केल्यानंतर बंजारा समाजानेही त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की," माझी बंजारा समाजाला विनंती आहे, आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं आवश्यक आहे. डोंगराच्या पल्याड हवेली आहे असं सांगितलं जातंय. ती हवेली आपल्याला कधी मिळेल ते मिळेल. पण आता आपलं झोपडं वाचवू. आता आपल्यामध्ये फूट पडेल असं कोणत्याही समाजाने वागू नये. एसटी आरक्षण कधी मिळेल याची माहिती नाही, पण तोपर्यंत आपल्या हक्काचं आरक्षण संपलेलं असेल. आता एकट्याने काही मागायची वेळ नाही. सगळ्यांनी मिळून आपलं आरक्षण वाचवलं पाहिजे."

एसटीतून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

हैदराबाद गॅझेटनुसार, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात हजारोंच्या संख्येनं बंजारा स्त्री पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटीतून आरक्षणाची मागणी करताना, त्यांनी खास पारंपारिक वेशभूषा केली होती. जय सेवालाल, एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या सभा घेत त्यांनी आदिवासी आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत मोर्चा नेण्याचा इशारा दिला.

अकोल्यातही बंजारा समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आंदोलन केलं. बंजारा समाज आरक्षण कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनातही पारंपरिक वेषातील बंजारा समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला.