Laxman Hake हिंगोली : सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटीअरचा शासन निर्णय हा ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संपवणारा जीआर आहे. मुख्यमंत्री यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी हा जिआर रद्द करावा. अन्यथा ओबीसी आरक्षण संपण्याची भीती आहे. तर आज हिंगोलीत कुणबी प्रमाणपत्र दिले, त्याच जिल्ह्यात आम्ही ते रद्द करावं म्हणून आंदोलन करत आहोत. ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मतांची काळजी लागली त्यांना आम्ही धडा शिकवणार. असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला आहे. शिवाय डीएनए ओबीसी म्हणून चालणार नाही, तर मुख्यमंत्र्यांनी कर्तुत्वातून तो दाखवायला पाहिजे असेही हाके म्हणाले.
हिंगोलीच्या (Hingoli) कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज हैदराबाद गॅजीटीअर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी औंढा नागनाथाचे दर्शन घेतले असून त्यांनी यावेळी माध्यमांशी बातचीत केलीय. त्यावेळी ते बोलत होते.
आपलं झोपडं या कारखानदारांनी उध्वस्त केलंय, ते वाचवण्यासाठी एकत्र येऊया - लक्ष्मण हाके
हैद्राबाद गॅझेटनुसार जर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, तर तांडा वस्तीवर राहणाऱ्या बंजारा समाजाला ही असं वाटू शकतं. बंजारा समाजाला विनंती आहे, आपल्या ताटातल आरक्षण वाचवनं हे गरजेचे आहे. आपलं झोपडं आधी वाचवू, आपल्यात फूट पडेल, असं कुठल्याच समाजाने वागू नये. असे म्हणत हाके यांनी बंजारा समाजाला आवाहन केलं आहे. आज रोजी आपली झोपडी उध्वस्त झाली आहे. त्या झोपडीला वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊया. महाराष्ट्रातील साडेचारशे जातींना विनंती आहे कि, आपलं झोपडं या कारखानदारांनी उध्वस्त केलं आहे. ते वाचवण्यासाठी एकत्र येऊया असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षानें एका चौथी नापास व्यक्तीला आंदोलनाचं नेतृत्व दिलं
विरोधी पक्षानें एका चौथी नापास व्यक्तीला या आंदोलनाचं नेतृत्व दिलं. त्यांना रसद पुरवली, त्यांनी बेकायदा मागणी केली आणि त्यांच्या म्हण्यावर सरकार हा बेकायदा जीआर काढला. त्यामुळे आम्हा ओबीसीचा कोणीही नाही. विरोधी पक्ष नाही आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा नाही. असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता टीका केली आहे.
जरांगे पाटलांच आंदोलन विरोधी पक्षांनी उभं केलंय. जर त्यांनी आंदोलन उभं केलं नसत, तर आमचं आरक्षण गेलं नसतं. शरद पवारांनी जर आंदोलन उभं केलं नसतं, तर ही बेकायदा मागणी आहे असं सांगितलं असतं. माझी राजकीय कारकीर्द एवढ्या वर्षाची आहे, हे मागासांच आरक्षण आहे. हे जर शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या कानात सांगितलं असतं. तर ही वेळ आमच्यावर आली नसती असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
तुम्ही नेहमी शरद पवारांवर टीका करता, जीआर तर फडणवीसांनी काढलाय ना? असा प्रश्न केला असता जीआर फाडून टाकलाय ना आम्ही, त्यांचं काय कौतुक करतोय का आम्ही, शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर आहे. फडणवीस म्हणतायत ओबीसीचा डीइनए आहे. पण नुसतं म्हणून चालणार नाही, तर ते कतृत्वाने दाखवावं लागेल असेही ते म्हणाले.