हिंगोली : ओबीसी सभेला येण्यापूर्वी भुजबळ यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते राजू सातव यांच्या कोहिनूर या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी त्यांचे स्वागत केले. तर, छगन भुजबळ यांनी राजीव सातव यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान, यावेळी भुजबळ यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. तसेच, 'मी सभेसाठी जाणारच' असे ठणकावून सांगितले. 


यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, दोन तीन ठिकाणी, चार-पाच लोक होते. त्यामुळे कुठेही माझा ताफा अडवला नाही. तसेच आपला ताफा कुठे थांबला देखील नाही. या देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी सभेसाठी जाणार आहे. तर, मी प्रकाश आंबेडकर यांना सांगतो, मी त्यांच्या विरोधात एकही शब्द बोललो नाही. या अडचणीच्या काळात आम्हाला त्यांचे सहकार्य पाहिजे. सोबतच मंडल आयोगासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मला खात्री आहे की ते आमच्यासोबत आहे. तसेच, त्यांनी सांगितलं आहे मराठा आणि ओबीसीचे ताट वेगवेगळे पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.