हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पिंपळदरी गावामध्ये नुकसानीचे पंचनामे केले जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या (Farmer) नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा दावा सध्या शेतकरी करत आहेत. या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करुन अहवाल दाखल केला.  याच पार्श्वभूमीवर  आयसीआयसीआय लोंगबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी आणि त्यांचे पर्यवेक्षक, कर्मचारी याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमकं प्रकरण काय?


ऑगस्ट 2022 या काळामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि मूग यांसारख्या पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहायला मिळालं. ,त्यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी या नुकसानाचा क्लेम करत पंचनामे करण्यात आले होते.


तसेच या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी देखील पिक विमा कंपनीकडून करण्यात आली होती.  तेव्हा विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतीच्या बांधावर येत पंचनामे करणे अपेक्षित होतं. पण असं काहीच झालं नाही. उलट पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानच झालं नाही असा अहवाल तयार केला. तर यावर शेतकऱ्यांचा बनावट सह्या देखील केल्या, असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 


पिक विमा कंपनीवर गुन्हा दाखल


हा प्रकार उघड झाल्यानंतर शेतकरी संघटनांसोबतच सामाजिक कार्यकर्त्ये चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान त्यांनी संबंधित पिक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कृषी विभागाकडे केली. पंरतु प्रशासनाच्या वतीने या मागणीला केराची टोपली दाखवली असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे मागील काही काळापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी ही मागणी जोराने लावून धरली. त्यानंतर कृषी विभागकडून या प्रकरणाची सखोल चौकशी देखील करण्यात आली. 


या चौकशीनंतर तब्बल एका वर्षानंतर पिक विमा कंपनीच्या विरोधात बुधवार (18 ऑक्टोबर) रोजी कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता या पिक विमा कंपनीवर कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 


पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच जक शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक होत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानाची भरपाई कशी मागायची असा सवाल सध्या शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. 


हेही वाचा : 


Sugarcane : मोठी बातमी! 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार, यावर्षी उत्पादनात होणार मोठी घट