हिंगोली : जिल्ह्यात एका किरकोळ कारणावरून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलाला चापट मारल्यामुळे सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, या वादात एका तीस वर्षीय युवकाची मारहाणीत जीव गेला आहे. या तरुणाला लाकडाने मारहाण करून त्याचा खून (murder) करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे ही घटना उघडकीस आली आहे. तर या मारहाणीत अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एकूण 9 आरोपींवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.बाळू राठोड (वय 30 वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील बाळू राठोड व प्रवीण राठोड यांच्यात लहान मुलास चापट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. यावरूनच एका महिलेकडून सतत बाळू राठोड यास शिवीगाळ करण्यात येत होती. हा नेहमीचाच प्रकार झाल्याने बाळू राठोड याने 7 ऑक्टोबर रोजी त्या महिलेस जाब विचारला. यावेळी पुन्हा शाब्दिक चकमक सुरु झाली. त्यानंतर वाद वाढत गेला आणि थेट हाणामारीला सुरुवात झाली. या हाणामारीत 9 जणांनी मिळून बाळू राठोड याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात व पाठीवर लाकडाने वार केले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाळू राठोडला तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी (8 ऑक्टोबर) रोजी त्याचा मृत्यू झाला.
उपचार सुरु असतानाच सोडले प्राण...
बाळू राठोड याला मारहाण सुरु असल्याने भांडण सोडविण्यासाठी बाळू यांचा भाऊ प्रेमदास व रोहिदास मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, यावेळी करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत बाळू राठोड गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्यात व पाठीवर लाकडाने मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचार सुरु असतानाच त्याने प्राण सोडले.
पोलिसांत गुन्हा दाखल...
या प्रकरणी प्रेमदास राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलिसांनी प्रवीण संतोष राठोड, संतोष रूपसिंग राठोड, सचिन संतोष राठोड, बबन शामराव चव्हाण यांच्यासह पाच महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने पाच जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : तिकिटाला पैसे नसल्याने पठ्ठ्याने चक्क ट्रॅक्टर चोरले, त्याच ट्रॅक्टरवरून जालना गाठले