छत्रपती संभाजीनगर : शहरात एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून जालन्याला (Jalna) जाण्यासाठ पैसे नसल्याने एका पठ्ठ्याने चक्क ट्रॅक्टर चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना याची खबर मिळताच त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे, या प्रकरणी ट्रॅक्टरमालकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र सखाराम बारबिंडे (वय 33, रा. बजरंगनगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी येथील नालंदा शाळेजवळ राहणारे रामनाथ तुकाराम राठोड यांचे ट्रॅक्टर (एमएच 28 डी 0529) व ट्रॉली मुकुंदवाडीतील इच्छामणी हॉटेलसमोर उभे होते. दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी याच ठिकाणी उभा असलेला ट्रॅक्टर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी सकाळी ट्रॅक्टर व ट्रॉली जागेवर दिसून आली नाही. कुणीतरी अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेली असल्याचे राठोड यांच्या लक्षात आले. त्यामुळे राठोड यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


जालन्याला जाण्यासाठी पैसे नव्हते...


दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच चिकलठाणा भागातील बजरंगनगर येथील राजेंद्र सखाराम बारबिंडे याने हा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने जालन्याला जाण्यासाठी पैसे नसल्याने ट्रॅक्टर चोरी केले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर जप्त केला आहे. तसेच त्याच्यावर चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.


ट्रॉली सोडून दिली...


राजेंद्र बारबिंडे याला जालना येथे जायचे होते. परंतु, त्याच्याकडे तिकिटाचेही पैसे नव्हते. अशात जालना कसे गाठायचे असा प्रश्न त्याला पडला होता. याचवेळी त्याला रस्त्यावर ट्रॅक्टर दिसले. त्यातचं तो आधी ट्रॅक्टर चालक राहिलेला आहे. त्यामुळे त्याने लगेचच ट्रॅक्टर डायरेक्ट करून सुरू केले अन् थेट जालना गाठले. सुरुवातीला ट्रॉली एका ठिकाणी सोडून दिली. त्यानंतर ट्रॅक्टर डिझेल संपल्यावर दुसऱ्या ठिकाणी उभे केले. पण पोलिसांनी याची माहिती मिळाली आणि त्याचा भांडाफोड झाला. 


यांनी केली कारवाई...


सदर कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे, पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, सहायक फौजदार नरसिंग पवार, पोहेकॉ बाबासाहेब कांबळे, पोलीस नाईक सुखदेव जाधव, पोअं अनिल थोरे, गणेश वाघ, समाधान काळे यांनी केले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crime News : लुडो खेळावरून मित्रांमध्ये झाला वाद, थेट बरगडीत चाकू खुपसून केला वार