हिंगोली: मागील काही दिवसांपासून खंड पडलेल्या पावसाने हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात कमबॅक केलं असून, कालपासून जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाल्यांना पुर आले आहे. काही ठिकाणी नद्या ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा फटका वाहतुकीला बसत असून, काही ठिकाणी वाह्तुकोंडी पाहायला मिळाली. दरम्यान, हिंगोलीच्या हापसापुर टेंभुर्णी गावाच्या शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतांना पाहायला मिळत आहे. तर काही गावांचा हिंगोली शहरासोबतचा संपर्क देखील तुटला आहे. 


हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील जीवनदायी असलेल्या कयाधू नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे समगा, वसई, दुर्गधामणीपूर, जामगव्हाण यासह अनेक गावांचा हिंगोली शहराशी संपर्क तुटला आहे. सणासुदीनिमित्त बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांना या पुरामुळे ताटकळत थांबावे लागले आहे. 


हिंगोलीच्या हापसापुर टेंभुर्णी गावाच्या शिवारामध्ये आज दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे हापसापुर टेंभुर्णी गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. नागरिकांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्य त्याचबरोबर अन्नधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाल्याची पाहायला मिळाले. तर, पावसाचा वेग एवढा होता की, अगदी काहीच वेळामध्ये नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. तसेच टेंभुर्णी गावाच्या शिवारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी झाले की, गावाला जणू तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातील गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाने याचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जात आहे. 


परभणी जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस...


हिंगोली प्रमाणेच परभणी जिल्ह्यात देखील आज सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावलीय. दोन दिवसांची विश्रांती घेऊन आज पुन्हा पाऊस परतला असल्याचे चित्र आहे. सकाळी सेलू, जिंतुर आणि पाथरी तालुक्यात जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे अनेक ओढ्या, नाल्यांना पाणी आले आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यात सकाळपासून संततधार पाऊस  सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच हा जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळालाच आहे, शिवाय खालावलेली पाणी पातळी वाढीसाठी देखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Monsoon Update : हवामान विभागाची मोठी घोषणा, मान्सूनचं अखेर टाटा, बाय-बाय!