हिंगोली : जिल्ह्यातील थोरावा गावामध्ये पिसाळलेल्या वानराने (Monkey) धुमाकूळ घातला आहे. या वानराने एकाच दिवसात गावातील चार जणांना चावा घेतल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या सणसुदीच्या दिवसामुळे शेतातील काम थांबून मोठ्या प्रमाणात नागरिक गावांमध्ये आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या घरी नातेवाईक सुद्धा आलेले आहेत. नागरिकांची वर्दळ असतांना पिसाळलेल्या वानराने गावातील पाच जणांना चावा घेतला आहे. विशेष म्हणजे यातील चौघांना एकाच दिवशी चावा घेतला आहे. तर, जखमी झालेल्या या नागरिकांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील थोरावा गावामध्ये पिसाळलेल्या वानराचा हैदोस पाहायला मिळत आहे. पिसाळलेल्या या वानराने नागरिकांसह इतर दहा ते पंधरा वानरांना सुद्धा चावा घेतला आहे. त्यामुळे चावा घेतलेली वानर सुद्धा पिसाळण्याची शक्यता आहे. या सर्व वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी वन विभागाला कळवले आहे. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त एकच पिंजरा आणि दोन कर्मचारी पाठवले आहेत. त्यामुळे या पिसाळलेल्या वानराला ताब्यात घेणे नागरिकांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे. वन विभागाने याची गंभीर देखल घेऊन जास्तीचे कर्मचाऱ्यांसह आणखी पिंजरे पाठवून पिसाळलेल्या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 


गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण! 


थोरावा गावामध्ये पिसाळलेल्या वानरामुळे गावकरी प्रचंड दहशतीखाली आहे. अचानक येऊन चावा घेणाऱ्या वानराने आतापर्यंत एकूण 5 जणांना जखमी केले आहे. त्यामुळे, गावकरी घराबाहेर पडण्यासाठी विचार करत आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना घराबाहेर जाण्यापासून पालकांकडून रोखण्यात येत आहे. तर, गावात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आता वन विभागाकडून या पिसाळलेल्या वानराला कधी पकडण्यात येणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


औंढा नागनाथमध्ये पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ 


एकीकडे हिंगोली जिल्ह्यातील थोरावा गावामध्ये पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ पाहायला मिळत असतांना, दुसरीकडे जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यासह शहरात पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांनी अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. लहाने मुले, महिला व वयोवृध्दांवर हे कुत्रे हल्ला करून चावा घेत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी औंढा नागनाथ नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Bhandara News: भंडाऱ्यात हॉटेलिंग करणारे माकड; ऐटीत बसून मारते नाश्त्यावर ताव, दर मंगळवार, शनिवारी वेळ आणि टेबलही असतो रिझर्व्ह