नागपूर : नागरिकांच्या समस्यांचा तत्काळ निपटारा व्हावा यासाठी 'लोकसंवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिन्याभरानंतर त्यातील काही प्रकरणे प्रलंबित असून हे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले. पालकमंत्र्यांनी आज सकाळी जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या 14 मे रोजी झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमातील प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेतला. नागपूर सुधार प्रन्यास आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सर्वाधिक तक्रारी प्रलंबित आहेत. पुढील महिनाभरात या सर्व तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
प्रलंबित असणाऱ्या तक्रारींमध्ये अनेक विभागांचा सहभाग असणाऱ्या तक्रारीदेखील समाविष्ट आहे. आपल्या विभागाची संबंधित नसलेले पत्र दुसऱ्या विभागाला पाठविणे म्हणजे कामाची पूर्तता होत नाही. त्यामुळे कामाची पूर्तता विहीत मर्यादेत होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी विभागप्रमुखांनी तातडीने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. या बैठकीला पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून सांत्वनपर शासकीय मदत
नागपूरः वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर शासकीय मदत दिली. गेल्या काही दिवसात मान्सून पूर्व वादळ वाऱ्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज पडून शेतात काम करणारे मजूर मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दोन दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आज पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या उमरेड तालुक्याला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला होत्या.
वीज पडून निधन झालेल्या इतवारीपेठ, उमरेड येथील दिवंगत उषा मांढळकर यांची कन्या दीपाली मांढळकर हिला 4 लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तर दुसऱ्या घटनेत शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्युमुखी पडलेले मौजा हिवरा येथील शेतकरी दिवंगत भाऊरावजी वाढई यांच्या पत्नी रमाबाई वाढई यांना सांत्वनपर शासकीय मदत म्हणून 4 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला उपस्थित होत्या.