वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे मिरननाथ महाराज. जन्मानं मुस्लीम असलेल्या या अवलियाचं समाधी मंदिर वर्धा-देवळी राज्यमार्गावर देवळीच्या शहराच्या मागच्या बाजूला आहे. मंदिराचा कळस आणि भव्य महाद्वाराचा काही भाग दूरुनच नजरेस पडतो. मदिराचं भव्य प्रवेशव्दार डोळ्यात भरण्याजोगं आहे. याच ठिकाणी मिरननाथ महाराजांनी अश्विन शुक्ल अष्टमी म्हणजे इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतली. नंतर इथं त्यांचं भव्य मंदिर बांधण्यात आलं.
जन्मानं पिंजारी मुसलमान असलेल्या महाराजांना मिरन संतांचा वारसा लाभला आणि त्यांचं नावच नंतर मिरननाथ झालं. त्यांचा पिंजारी मुस्लीम कुटुंबात झाला. साधारण दहा वर्षाचे असतांना ते अमरावती जिल्ह्यातल्या शेंडोळे गावात आले. लहानपणापासून विठू नामाची ओढ त्यांना लागली होती. शेंडोळे गावात विश्वनाथ महाराजांच्या कीर्तनला जात असत आणि पुढे त्यांनी विश्वनाथ महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली. इथेच त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत प्रगाढ ज्ञान मिळवलं.
विठूरायाचा दर्शनासाठी ते वाऱ्या करू लागले. दरम्यान त्यांनी देवळीवरून दोन वाऱ्या केल्या. पण मुस्लीम असल्यानं त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही. मिरननाथ महाराजांनी तिसऱ्यांदा वारी केली तेव्हासुद्धा मंदिरात येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. यावेळीही त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही.
यासंदर्भात एक आख्यायिका सांगण्यात येते. महाराजांना मंदिरातील बडव्यांनी हाकलून लावले. त्यांनी जवळच्या वाळवंटात जाऊन कीर्तन केलं. तिथे मिरननाथ यांच्या पायाला फोड आले. दुसऱ्या दिवशी तेथे एका ब्राह्मणाला विठूरायाचा दृष्टांत झाला आणि त्यानं मिरननाथांना मंदिराजवळ नेलं. त्या ब्राह्मणाला विठुरायाच्या चरणी मिरननाथ महाराज दिसू लागले. शेवटी सगळ्या बडव्यांनी यांची माफी मागतली आणि मिरननाथांसमोर ते नतमस्तक झाले.
याच मंदिरात आणखी दोन समाधी आहेत. एक मंदिराचे आद्य संस्थापक शिवराम महाराज ठाकूर आणि दुसरे हरीसुत उर्फ रामजी हरी फुटाणे. रामजी हरी फुटाणे बराच काळ मिरननाथ महाराजांसोबत होते. त्यांनी 300 पानी एक पुस्तक पद्य स्वरूपात लिहून महाराजांविषयी माहिती लिहून ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या चमत्काराचा पुरावा असलेलं लिखित साहित्य उपलब्ध आहे. पण दुर्दैवाने हे पुस्तक अद्यापही प्रकाशित झालेलं नाही. एक पुस्तक ओवीस्वरुपात हभप सुरेंद्र मुळे यांनीही लिहिलं आहे.
संत परंपरेत जोग महाराजांच्या काळात वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे मिरननाथ महाराज यांचा अश्विन शुक्ल अष्टमीदिवशी पुण्यतिथी सोहळा देवळीत साजरा होतो. यावेळी मंदिरापुढे 15 दिवस यात्रा भरते. भजन, कीर्तन, दिंडी, दहीहंडी सोहळा साजरा होतो. आकाशाएवढ्या कर्तृत्वाच्या अवलिया संताला देवळीनं ग्रामदैवत म्हणून स्वीकारलं आहे, पण त्यांची महती आणि किर्ती देवळीपुरतीच मर्यादित राहिली ही दुर्दैवाची बाब आहे.