वर्धा : ग्रामदैवत म्हटलं की गावातील प्रत्येक घरात त्याला अनन्यसाधारण महत्व असतं. सिद्धीविनायक म्हणजेच गणपती हिंदू धर्मात प्रथमपूजेचा मान असणारं दैवत आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करायची झाली तर पहिला मान गणपतीचा असतो. अग्रपूजाधारी सिद्धीविनायक वर्ध्याच्या सेलुकरांचं केळझर इथं वसलेलं ग्रामदैवत आहे.

सेलूच्या सिद्धीविनायकाची आख्यायिका

वशिष्ठ ऋषी याठिकाणी वास्तव्यास असताना पूजाअर्चा करण्यासाठी सिद्धिविनायकाची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. तसंच कुंतीपुत्र भीमाने एकचक्र नगरात अज्ञातवासात असताना याच ठिकाणी बकासुराचा वध केल्याचं सांगितलं जातं. तसंच भोसले घराणं कोल्हापूरवरुन नागपूरला स्थलांतरीत होत असताना येथे मुक्काम केल्याचं सुद्धा सांगण्यात येतं.

निसर्गरम्य परीसरात मंदिर

मंदिराचा संपूर्ण परिसर हा डोंगर टेकड्यांचा आहे. मधोमध असलेल्या टेकडीवर हे गणेशाचं मंदिर आहे. वर्धा-नागपूर राज्यमार्गावरील केळझरच्या या गणेशाला हजारो वर्षाचा इतिहास असल्याचं बोललं जातं. त्यामुळे लोकांची श्रद्धा अधिक आहे. दूरवरुन मंदिराचा कळस डोळ्यात भरतो. साधारणपणे सोळा एकराचा हा परिसर आहे. इथे गणेशाची शेंदुराची लोभस मूर्ती आहे. मुर्तीची उंची चार फुट सहा इंच आहे, तर तिचा व्यास हा साधारण 14 फुटांचा आहे. मंदिरात चांदीचं सिंहासन असून मंदिराच जूनेपण टिकवलं गेलेलं नाही. हा परिसर मात्र शांत आणि रमणीय आहे. 1993 पासून इथलं व्यवस्थापन ट्रस्टच्या माध्यमातून चालवलं जात आहे.

मंदिराचा जिर्णोद्धार करत असतांना पाण्याची गरज भासली तेव्हा मंदिर परिसरात उत्खनन करण्यात आलं. उत्खनन सुरु असतांना काही पुरातन मूर्ती आढळून आल्या. यात शंख आणि सुदर्शन चक्रधारी विष्णू सुद्धा आहे. महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा उत्खननात मिळाली असून त्याची स्थापना करण्यात आली आहे.

गणेशजयंतीला भव्य उत्सव

याठिकाणी वर्षभरात गणेश जयंती निमित्त 7 दिवस पूजा आणि आरती सोहळा साजरा केला जातो. तसंच पौष महिन्यात काकड आरती आणि संकष्ट चतुर्थीला एक दिवसाची यात्रा सुद्धा असते. यात्रेवेळी गावातून दिंडी काढली जाते. दिंडीनंतर भंडारा आणि महाप्रसाद असतो.

नागपूर-वर्धा मार्गावर असल्यानं यामार्गाने जाणारे प्रवासी दर्शनाचा मोह आवरु शकत नाहीत. मनातील इच्छा पूर्ती झाल्यास अन्नदान करत भंडारा केला जातो. संपूर्ण परिसर डोंगरात असल्यानं रमणीय आणि शांत वातावरण असतं. मंदिराच्या मागच्या बाजूला एका गणेश तलाव आहे. तिथे पक्ष्यांचा वावर असतो.

नवीन सोयीसुविधा

पर्यटन स्थळातील क दर्जा प्राप्त झाल्यानं शासनाचा निधी मिळू लागला आहे. पण याठिकाणचं भक्त निवास राहण्याजोग नाही. मंदिर परिसरात खालच्या बाजूला नवीन सभागृह बनविण्याच काम सुरु आहे.