कोल्हापूरः सह्याद्रीच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य वनराईत लाखो भाविकांचं श्रद्धस्थान असलेली विठ्ठलाई वसली आहे. भक्तांना पावणारी आणि महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकांचा आधारवड असणारी विठ्ठलाई कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड या गावात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका म्हटलं तर राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आणि घनदाट अरण्य आपल्यासमोर येतं. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होत असतात. मात्र याच परिसरात एक अनोखं ठिकाण आहे, ते म्हणजे दुर्गमानवाड हे गांव.
दर्शनासोबतच पर्यटनाचा आनंद
कोल्हापूर पासून 60 किमी आणि राधनगरी गावापासून अवघ्या 8 किमीवर घनदाट जंगलातून वाट काढत दुर्गमानवाड या गावी जावं लागतं. सध्या या परिसरात चांगला रस्ता केल्यां इथं भाविकांची मोठी वर्दळ वाढलेली आहे. दुर्गमानवाड परिसरात एक पुरातन छोटं मंदिर बांधलं गेलं. सध्या हे मंदिर मोठं आणि भव्य दिसत असलं तरी शेकडो वर्षांपूर्वी हे छोटं मंदिर चौकोनी अकारात होतं.
या मंदिरात अडीच फुट उंचीच्या शिळेत देवीची मुर्ती आहे. सध्या या मंदिरात दर्शनासाठी पितळी मुर्ती ठेवण्यात आली आहे, गाभाऱ्यातील देवीचं रुप पाहिलं तर मन प्रसन्न होतं. विठ्ठलाई देवीच्या मागेही एक मूर्ती आहे. शिवाय गाभाऱ्या समोरच कासव आहे .
विठ्ठलाई देवी भक्तांच्या नवसाला पावणारी देवी असल्याने इथं आजही लाखो भाविक पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येतात. पूर्वीपासून मंदिराभोवती देवीची पुजाअर्चा करणारे गुरुव समाज्यातील घरं इथं आहेत.
गुरव समाज्यातील पुजाऱ्याकडेच देवी आणि मंदिराची जबाबदारी पूर्वीपासून चालत आलेली आहे. मंदिराभोवती देवीच्या पुजेसाठी लागणा-या वस्तूचे स्टॉल उभे आहेत. मंदिराचा कळस 51 फुटांवर असून सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरु करण्यात येणार आहे.
विठ्ठलाईची अख्यायिका
सह्याद्रीच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य वनराईत विठ्ठलाईदेवी वसली आहे. आजही लाखो भाविक तिच्या दर्शनासाठी येतात. पुरातन काळी दुर्गमानवाड आणि तारळे या परिसरामध्ये तारकासूर आणि व्याघ्रासूर नावाचे दोन राक्षस होते.
राक्षस त्या भागातील लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देत. त्यामुळे त्या परिसरातील लोक भयभीत होऊन जीव मुठीत धरुन राहत असत. कालांतराने लोक एकत्र आले आणि त्यांनी भगवंताचा धावा चालू केला.
नवसाला पावणारी विठ्ठलाई
विठ्ठलाई देवीला पूर्वी दुर्गामाता म्हणत. पूर्वी गावापासून दूर गावठाण्यात सर्व लोक रहात. अलीकडच्या काळात पूजाअर्चा करण्यासाठी गुरव येऊन राहू लागले. या देवीला बर्याच वेळा कौल लावला जातो आणि तो कौल खराही ठरला जातो. अनेक लोक देवीला नवस बोलतात आणि ते नवस फेडण्यासाठी देवीला खारा नैवेद्य दाखवला जातो.
पूर्वी देवीला कौल लावल्यावर देवीच्या पडद्याआडून ते दिव्य त्या डोंगरावर पडले. तेथे जिवंत वनराई निर्माण झाली. रुढी परंपरेने विठ्ठलाई असे नाव प्रचलित झाले. जेथे राक्षसांचा वध केला तेथील भाग वाघ्रीत या नावाने ओळखला जातो. ही देवी फार प्राचीन काळी वाघावरुन पूर्व दिशेने आली. तिने तारळेपासून दोन किलोमीटर अंतरावर पाल्याच्या ठिकाणी विसावा घेतला. आजही त्या खडकावर पाऊलखुणा आहेत.
दुर्गमानवाड इथं गुडीपाढव्याच्या दोन दिवस अगोदर विठ्ठलाईदेवीची यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविक दाखल होत असतात. तर नवरात्रीत 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.