मुख्यमंत्री काय म्हणाले?
"महाराष्ट्राने 2 लाख टन तूर खरेदीची परवानगी केंद्राकडे मागितली होती. मात्र, महाराष्ट्राला सध्या एक लाख टन खरेदीची परवानगी दिली असून, उर्वरित एक लाख टना खरेदीची मागणीही तत्वत: मान्य केली आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून आणखी एक लाख टन तूर खरेदीलाही परवानगी दिली जाईल, असे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिली.
व्यापाऱ्यांवर नजर ठेवणार : मुख्यमंत्री
यंदा जवळपास सहा लाख टनाहून अधिक तूर खरेदी होईल आणि हा एक विक्रम असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय, शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी तूर टाकणार असतील, तर त्यांच्यावर नजर ठेवली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.
आधी 22 एप्रिलपर्यंत तूर खरेदीची परवानगी होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर 31 मे पर्यंत तूर खरदी करण्याची परवानगी मिळाली आहे.
मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच महाराष्ट्रातील तूरप्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
बारदाण्याचा प्रश्न कायम
एक लाख टन तूर खरेदीची परवानगी मिळाली असली, तरी बारदाणा उपलब्ध करुन देणार का, हा प्रश्न कायम आहे. कारण यापूर्वी बारदाण्याअभावी तूर खरेदी रखडली होती.
एबीपी माझाची तूर परिषद
दरम्यान, एबीपी माझाने महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्ना सातत्याने उचलून धरला आहे. यवतमाळमध्ये एबीपी माझाने तूर परिषद आयोजित करुन शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी पोहोचवल्या होत्या.
बातमीचा व्हिडीओ -