मुंबई: केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे 5 लाख टन  कच्ची साखर आयात केली जाणार आहे.  या निर्णयामुळे साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.


12 जूनच्या आत साखर आयात केल्यास आयात ड्युटी फ्री असेल. त्याचा फायदा दरावर होईल.

यंदा देशातील साखरेचं उत्पादन अंदाजे 2 कोटी टनाच्या आसपास होण्याची शक्यता आहे. मात्र देशाची साखरेची गरज ही अंदाजे अडीच कोटी टन इतकी आहे.

त्यामुळे या मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ घालून, किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.

भारतीय साखर महासंघाच्या (इस्मा- इंडियन शुगर मिलर्स असोसिएशन) अंदाजानुसार यंदा भारतात 2 कोटी 3 लाख टन साखरेचं उत्पादन होईल. मात्र भारताची साखरेची गरज ही 2 कोटी 40 लाख टन इतकी आहे. त्यामुळे ही वाढीव गरज भागवण्यासाठी आता साखर आयात केली जाणार आहे.

दरम्यान, भारतात या हंगामाच्या सुरुवातीचा साखरेचा 77 लाख टन इतका साठा शिल्लक आहे.  अशाप्रकारचा राखीव साठा नेहमी ठेवला जातो. पण खबरदारी म्हणून सरकारकडून तजवीज केली जाते.

यंदाचा गाळप हंगाम 1 ऑक्टोबर 2017 ला सुरु होईल, तेव्हा आपल्याकडे 35 ते 40 लाख टन साखरेचा साठा शिल्लक असेल. हा साठा देशांतर्गत गरज भागवण्यासाठी पुरेसा असेल, असा विश्वास 'इस्मा'ने  व्यक्त केला आहे.