आमच्या अंगणात सुपारी उर्फ पोफळीची झाडं आहेत. फळं पिकली की तिथं कोकिळांचा राबता सुरू होतो. अंगभर ठिपके ल्यायलेल्या कोकिळाबाई सुपारीच्या घोसांसोबत झुलताहेत असं एक चित्रही मी एकदा काढलं होतं. मिनी नारळ असावं तसं दिसणारं फळ. पिकू लागलं की हिरव्याचं पिवळं, मग केशरी, मग लाल असे रंग बदलतं. उंच झाडावर लटकणारी ती कडक, टणक फळांची झुंबरं वाटेने चालताना सतत मान वर करून बघायला लावतात.



लहानपणची आठवण अशी की, घरी पानसुपारीचा डबा असायचाच; त्याला पानदान असं म्हणत. कुणीही आलं की आधी पानदान उघडून समोर दिलं जाई, मग पाणी, चहा इत्यादी. चहा घेणार का, इत्यादी प्रश्न विचारण्याची पद्धत नव्हती. मराठवाड्यातून मुंबईत लग्न होऊन आले, तेव्हा समजलं की इकडे ही पद्धत नाही. कतरी सुपारी आणि पानाचा विडा हा शौक मग बंदच झाला. नंतर अगदी सलग, रोज सकाळ-संध्याकाळ विडा खाल्ला तो बाळंतपणात. पुन्हा कधी नाही.

पानसुपारीनं असं स्वागत करण्याची पद्धत नंतर आसाममध्ये दिसली. ही ‘क्वाई’ खूप दिवस भिजत घालून ठेवतात आणि पाणी बदलत राहतात. त्यामुळे ती बराच काळ टिकते, असं सांगतात. ओली सुपारी आणि पान देऊन अतिथीचं स्वागत केलं जातं. आसाममध्ये पानसुपारीची एक लोककथा देखील मिळाली.



दोन बालमित्र होते. एक श्रीमंत व्यापारी आणि एक गरीब मजूर. व्यापारी कामानिमित्त सतत प्रवासात असायचा आणि मजूर मिळतील ती कामं करत असल्याने त्याचाही काही ठावठिकाणा नसायचा. त्यामुळे त्यांचा संपर्क पर तुटून गेला होता. एकदा अचानक बाजारवाटेवर दोघं भेटले. व्यापाऱ्याचं घर तिथून जवळ होतं. त्यानं अत्यंत प्रेमानं आपल्या मित्राला घरी नेलं. त्याच्या घरच्यांनी देखील पाहुण्याची उत्तम बडदास्त राखली. अनेक उत्तमोत्तम पदार्थ रांधून त्याला जेवूखाऊ घातलं. तो परत निघाला, तरी मित्राला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण काही देऊ धजला नाही. पण एकेदिवशी व्यापाऱ्याने त्याला निरोप धाडला की, “उद्या कामावर जाऊ नकोस, मी तुझ्या घरी येणार आहे.”

मजूर भांबावून गेला. घरात सगळा खडखडाट होता. डब्यात एकही दाणा नव्हता. त्याची बायको शेजारी काही उसनंपासनं मिळतंय का ते पाहून आली. पण वस्तीतल्या सगळ्यांचीच स्थिती साधारण सारखीच, त्यामुळे कुणाकडूनच मदत मिळाली नाही. उद्या व्यापारी मित्र घरी आला, तर त्याला खायला द्यायला आपल्याकडे काहीच नाही, या ओशाळ भावनेने ती नवरा-बायको दु:खी झाली आणि काही न सुचून त्या रात्री दोघांनी छातीत सुरे खुपसून घेऊन घेऊन आत्महत्या केली. व्यापारी दुसऱ्या दिवशी सकाळीच आला, तर त्याला हे दृश्य दिसलं. घराची अवस्था पाहून त्याला वस्तुस्थिती ध्यानात आली. आपल्यामुळे मित्राला काही मदत तर झालीच नाही, उलट त्याने आत्महत्या केली या ताणाने त्याला हृद्यविकाराचा झटका आला आणि तोही तिथंच मरून पडला. व्यापाऱ्याचा पाठलाग करत असलेला एक चोर तिथं आला आणि हे दृश्य पाहून किंचाळला. त्याची किंकाळी ऐकून आजूबाजूचे लोक घराकडे धावत येऊ लागले. आपल्याला खुनी समजून लोक मारतील, या भयाने चोरानेही प्राण सोडले. लोक आले तेव्हा घरातली जमीन रक्ताने भरलेली पाहून हळहळू लागले.

नागवेलीचं पान हे त्या गरीब मित्राचं प्रतीक बनलं. त्याची बायको चुना, व्यापारी मित्र सुपारी. चोर म्हणजे तंबाखू... कारण तो तोंडात लपून बसतो आणि नुकसानही करतो. विड्याचा लाल मुखरस हे रक्ताचं प्रतीक बनलं. तेव्हापासून आसाममध्ये अतिथीला पानविडा न देता फक्त
पानसुपारी देण्याची प्रथा सुरू झाली.

सुपारी मूळ मलेशियातली असून आपल्याकडे केरळ, कर्नाटक व आसाम या तीन राज्यांत प्रामुख्याने होते. महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, प. बंगाल, मेघालय आणि तमिळनाडू इथं तुलनेत बरीच कमी. सुपारीची आणि तिच्या झाडाची नावं किती... घोंटा पूग, पूका, क्रमुक, गुवाक, खपुर, सुरंजन, पूग वृक्ष, दीर्घपादप, वल्कतरु, दृढ़वल्क, चिक्वण, पूणी, गोपदल, राजताल, छटाफल, क्रमु, कुमुकी, अकोट, अडीके, तंतुसार... अशी अनेक! शंभरेक वर्षं जगणारं हे झाड वयाच्या तिशीनंतर फळं द्यायला सुरुवात करतं. नारळ –पोफळीच्या बागा, इथं निवांत फिरत राहाव्यात अशा असतात. जोडीला नागवेल, मिऱ्यांचे वेल, वेलदोडे, जायफळ, केळी देखील असतात. ‘स्पाईस फार्म’ ही अनेकांनी खास परदेशी पर्यटकांना आकर्षून घेणारी स्थळं बनवली आहेत. मी प्रथम गोव्यात अशी मसाल्यांची शेती पाहिली.







अंबुतीर्थ बघण्यासाठी कर्नाटकात गेले होते, तेव्हा सुपारीपत्रांच्या टोप्या विकत घेतलेल्या. याच टोपीत जेवायचं, पाणी प्यायचं, विसळून पुन्हा डोक्यावर घालायची. खराब झाली की, फेकून दुसरी बनवायची. बनवणं देखील बिनकष्टाचं, काहीसं सोपंच. कचरा मातीत मिसळून विघटीत होणारा. त्यामुळे हे अगदी इकोफ्रेंडली दिसतंय म्हणेतो रिसोर्टमध्ये जेवण आलं ते सुपारीपत्रांच्या यंत्राद्वारे बनवलेल्या सुबक ताटावाट्यांत! त्याचा आनंद तर फारच मोठा होता. अनेक स्वयंसेवी संस्था स्त्रियांना प्रशिक्षण देऊन हे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मदत करताहेत, हे पाहून समाधान वाटलेलं.



ठाकरांच्या लोकगीतांमध्ये मला सुपारीचं एक सुंदर गीत मिळालेलं...

नागयेल तासाला पेरली, त्या येलीवर न् त्या येलीवरं...

सुपारी माझी आईबाई त्या येलीवर न् त्या येलीवरं...

चुना माझा भरतारू, कात माझा मैतरू...

त्या येलीवर न् त्या येलीवरं...

नागवेलीसारखी नाजूक तरुणी, तिच्या आईसारखी कडक आणि ठसकेबाज सुपारी, चुन्यासारखा सभ्य दिसणारा पण पोळून काढणारा तिचा नवरा आणि ज्याच्यामुळे आयुष्य रंगीत बनलंय तो कातासारखा तिचा मित्र... प्रियकर! आयुष्याचा विडा असा रंगलेला! एकही घटक कमी झाला, तर विडा बनणार नाही.

बायकांच्या मनात किती काही असतं... लोकगीतं तो खजिना असा अचानक खुला करतात.

सर्व फोटो: कविता महाजन

‘घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!


घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…


घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई