Gondia New : गोंदिया (Gondia)जिल्ह्यात चुटिया इथं पाच कोटी 72 लाखांचा तांदूळ खरेदी घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संचालकांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने (Shri Ram Abhinav Cooperative Society) शासकीय धान (Rice) (तांदूळ) खरेदी केंद्रावर खरीप आणि रब्बी हंगामात खरेदी केलेल्या एकूण 28 हजार 59 क्विंटल धानाची अफरातफर करून 5 कोटी 72 लाख 40  हजार 625 रुपयांचा घोटाळा करुन शासनाची फसवणूक केली आहे. 


याप्रकरणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी या संस्थेच्या 11 संचालकांसह 4 कर्मचारी अशा एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतात. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणाऱ्या संस्थांना प्रति क्विंटल कमिशन देत असते. या संस्थांनी केंद्रावर खरेदी केलेला तांदूळ मिलर्ससह करार करुन भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र, चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेला 12 हजार 63 किलो आणि रब्बी हंगामातील 15 हजार 996 क्विंटल असा एकूण 28 हजार 59 क्विंटल 13 किलो धान एकूण किंमत पाच कोटी 72 लाख 40 हजार 625 रुपयांचा धान फेडरेशनकडे जमा केला नाही. शिवाय खरेदी केलेला धान या संस्थेच्या गोदामातसुध्दा शिल्लक नव्हता. त्यामुळे या संस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांनी पाच कोटी 72 लाख 40 हजार 625 रुपयांच्या धानाची अफरातफर करुन शासनाची फसवणूक केली. त्यामुळं जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये श्रीराम अभिनव सहकारी संस्थेचे 11 संचालक आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर, ग्रेडर, केंद्र प्रमुख अशी एकूण 15 लोकांचा समावेश आहे. भादंवि कलम 409, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Paddy sowing : देशात भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ, तर तेलबियांसह कापूस लागवडीत घट; वाचा कृषी मंत्रालयाची आकडेवारी