Gondia News : सध्या राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे. धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातही शेतकरी शेती कामात व्यस्त असताना दिसत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील डव्वा इथं विद्यार्थीनींनी देखील शेतीच्या कामात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. शेतात जाऊन शालेय विद्यार्थीनींनी शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी केली आहे. डव्वा येथील निवासी शाळेनं हा आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे.
गोंदियामध्ये उत्पादित होत असलेल्या धान पिकाबदल शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थीनींनी चक्क शेतकऱ्यांच्या शेतात जावून शास्त्रीय पद्धतीनं भात पिकाची रोवणी केली आहे. तर यावेळी शिक्षकांकडून भात रोवणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विद्यार्थीनींना देण्यात आलं. या शाळेने राबवलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.
राज्यात सद्या धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं राज्यातील काही ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. कारण काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं शेती पिकांचं देकील मोठं नुकसान झालं आहे. पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया जाण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी जमीनी देखील खरवडून गेल्या आहेत. मात्र, सध्या सुरु असलेला पाऊस भात पिकासाठी पूरक ठरत आहे. भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. भात लागवड महिनाभर उशिरा सुरु होऊनही शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. म्हणूनच तुफान पावसातही लागवडीची लगबग सुरु झाली आहे. जून महिन्यात राज्यातील बऱ्यापैकी भागात पावसानं दडी मारली होती. मात्र, अखेर चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेती कामांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच शेतीबाबत त्यांनी संपूर्ण ज्ञान अवगत व्हावं यासाठी विद्यार्थ्यांनींनी शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणीचं प्रशिक्षण देण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या:
- Agriculture News : मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणीसाठी यंत्राचा वापर, शेतकऱ्यांना होणार फायदा
- Pune rain : राज्यातील शेतकरी चिंतेत, मावळमधील मात्र आनंदी, तुफान पावसात भात लागवडीला वेग