गोंदिया : गोंदियातील (Gondia) देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीवरुन काँग्रेसचे विद्यमान आमदार सहसराम कोरोटे (Sahasram Korote) आणि भाजपचे माजी आमदार संजय पुराम (Sanjay Puram) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाचे (Independence Day) औचित्य साधून काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी या इमारतीचे लोकार्पण केले आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित साधून रुग्णालयाचे लोकार्पण
देवरी इथे 12 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन ग्रामीण रुग्णालयाची इमारत (Rural Hospital Building) तयार करण्यात आली. पण या इमारतीत फर्निचरची कामे होण्यास दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे ही कामे झाल्यावरच ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करु देणार, अशी भूमिका भाजपचे माजी आ. संजय पुराम यांनी घेतली होती. तर ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली असून या इमारतीतून कारभार चालवणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणे असे आहे. नवीन इमारत बनली असून या इमारतीचे लोकार्पण 15 ऑगस्ट 2023 रोजी करुन रुग्णांची गैरसोय दूर करणार असल्याची भूमिका आमदार सहषराम कोरोटे यांनी घेतली. अखेर काल स्वातंत्र्यदिनाचे औचित साधून आमदार कोरोटे यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण केले. आरोग्यमंत्र्यांना भेटून लवकरच या रुग्णालयात रुग्णांना उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन आमदार कोरोटे यांनी दिले आहे.
आजी-माजी आमदारांच्या लढाईत विद्यमान आमदार ठरले वरचढ
आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच देवरी तालुका हा आदिवासी बहुल, अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या तालुक्यात आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे तालुकास्तरावर रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा घ्यायला यावे लागते. मात्र देवरी ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था हे व्हेंटिलेटरवर असून इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात छत गळत असून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. याचीच दखल घेत आमदार सहसराम कोरोटे यांनी कुठलाही मुहूर्त न बघता इमारतीचे लोकार्पण केलं आहे. लवकरच आरोग्यमंत्र्यांशी बोलून नव्या इमारतीत आरोग्य सुविधा द्यायला सुरुवात करु असं आश्वासन आमदार कोरोटे यांनी दिलं आहे.
हेही वाचा