Gondia Rains : गोंदिया (Gondia) जिल्ह्यात मंगळवारी (18 जुलै) दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये वाढ झाली आहे.  त्यापैकी पुजारीटोला धरण हा रात्रीच्या पावसाने भरलं असून या धरणाचे 4 वक्रद्वार (गेट)  उघडण्यात आले आहेत. त्यामधून 2998 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर कालीसरार धरणाचे 2 गेट उघडले असून त्यामधून 1743 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातून पाणी सोडल्याने बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


तीन दिवसांपूर्वीच आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पुजारीटोला धरणाचे 8 दरवाजे एक फूट उंचीने उघडण्यात आले होते आणि त्यातून 6021 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.


धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ 


यंदा गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मोठी धरण, मध्यम व लघु प्रकल्पासह तलावातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस होत असल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत आहे. यंदाच्या परतीच्या पावसामुळे उन्हाळ्यात गोंदिया जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यावर अपेक्षित असा परिणाम जाणवला नाही. त्यात आता मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह मध्यम व लघु प्रकल्पासह तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जलाशयात मुबलक पाणी साठा आहे.


भर उन्हाळ्यात पुजारीटोला धरण 92 टक्के भरलं होतं


दरम्यान तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात अनेक तलाव, धरण कोरडी पडली होती. परंतु त्याच वेळी गोंदिया जिल्ह्यातील  पुजारीटोला धरणात मात्र 92 टक्के जलसाठा उपलब्ध होता. गोंदिया जिल्ह्यातील शिरपुर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुजारीटोला धरणात पाणीसाठा करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात पुजारीटोला धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलेला होता. परिणामी या भागातील नागरिकांची दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट यंदा थांबली होती. 

पर्यटकांना खुणावतोय हाजरा फॉल धबधबा


महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ तीन राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे स्थळ मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे. निसर्गाच्या सुंदर कुशीत उंच डोंगरावरुन कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरु करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे. जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते. इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले, म्हणून त्याला हाजरा फॉल असे नाव पडले.

हेही वाचा


Gondia Rains : गोंदियात दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला, आजारी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वडिलांची कसरत