Gondia Rains : गोंदिया (Gondia) जिल्ह्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. अशातच कोसमतोंडी-बोळूंदा या दोन गावांना जोडणारा पूल पुरात (Flood) वाहून गेला. यामुळे इथल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आजारी मुलाला उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन जाताना वडिलांना पुरात वाहून गेलेल्या रस्त्यावरुन कसरत करावी लागली.
जोरदार पावसामुळे दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला
गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी-बोळूंदा या दोन गावांना जोडणाऱ्या एकमेव पुलाचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी बनवण्यात आला. मात्र गेल्या 24 तासात गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. त्यात कोसमतोंडी-बोळूंदा या दोन गावांना जोडणारा पूल पुरात वाहून गेला.
पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना आजारी मुलासाठी वडिलांची कसरत
आधीच दुर्गम भाग, त्यात जोरदार पाऊस आणि पूल वाहून गेल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत आजारी पडलेल्यांना उपचारांसाठी दवाखान्यात नेतानाही मोठी कसरत होत आहे. बोळूंदा इथल्या रवी कापगते यांच्या चार वर्षीय चिमुकल्याती प्रकृती बिघडली. त्याला उपचारांसाठी कोसमतोंडी या गावात न्यायाचं होतं. परंतु या गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना या रस्त्यावरुन मोठी कसरत करावी लागली.
प्रशासनाकडून दुर्लक्ष, गावकऱ्यांमध्ये रोष
विशेष म्हणजे पूल वाहून गेल्यानंतर कुठलेही मदतकार्य प्रशासनाच्या वतीने किंवा संबंधित कंत्राटदाराच्या वतीने करण्यात आले नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.
48 तासाच्या मुसळधार पावसानंतर नदी नाले तुडुंब, पांगोली नदीसह अनेक छोट्या नाल्यांना पूर
गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु असून गोंदिया शहराजवळून वाहणाऱ्या पांगोली नदीसह अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे गोंदिया-आमगाव महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक छोट्या नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. पुलावरुन पाणी वाहत असताना नागरिकांनी प्रवास करु नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान गोंदिया शहराच्या जवळून वाहणाऱ्या पांगोली नदीवर बारब्रिक्स कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र हा पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी दुसऱ्यांदा हा पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
हेही वाचा