Gondia Rain : राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, गोंदिया (Gondia) जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील पुजारीटोला आणि शिरपुर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं शहरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.


अचानक आलेल्या पावसाचा नागरिकांना फटका


गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि शिरपूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मध्य रात्रीच्या सुमारास शहरातील काही सखोल भागात रस्त्यावर आलेला पाणी नागरिकांनच्या घरात शिरलं आहे. शहरातील आदर्श कॉलनी भागातील काही घरात तसेच अंगुर बगीचा भागात देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे.




राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी


राज्यात काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तसेच अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता


बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भात आधीच काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी जमिनी देखील खरवडून गेल्या आहे. अशातच पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : आज विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन