Gondia News : मागील तीन महिन्यांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रुळावर आले नसून त्यातच आता दक्षिण-पूर्व व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाईन आणि इंटरलॉकिंगच्या कामामुळे 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या 9 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष बाब अशी की 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस ही नागपूरवरुनच सुटणार आहे. एकूण 58 रेल्वे गाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.


दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाईनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले असून यापुढील काम शिल्लक आहे. काचेवानीने तुमसर रोड व काचेवानी रेल्वे स्थानकापर्यंत थर्ड लाईन आणि इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे 22 नियमित आणि 36 साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.



'या' गाड्या 30 ते 5 सप्टेंबरपर्यंत रद्द
30 ते 5 सप्टेंबरपर्यंत रद्द असलेल्या गाड्यांमध्ये दुर्ग-गोंदिया स्पशेल व गोंदिया दुर्ग रायपूर, स्पेशल, गोंदिया- इतवारी, गोंदिया-इतवारी मेमू रायपूर इतवारी स्पेशल, इतवारी-रायपूर, कोरबा-इतवारी, इतवारी-बिलासपूर, इंटरसिटी, टाटानगर, शालिमार एक्स्प्रेस, अमृतसर-कोरबा एक्स्प्रेस, कोरबा-अमृतसर एक्स्प्रेस हावडा मेल, मुंबई मेल, हावडा-अहमदाबाद, अहमदाबाद हावडा, आझाद हिंद एक्स्प्रेस, एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, सिंकदराबाद-दरायपूर-सिकंदराबाद, बिलासपूर भगत की कोठी, रिवा इतवारी, पुरी-गांधीधाम, गांधीधाम-पुरी, पोरबंदर या गाड्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा आठ ते दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आधीच छत्तीसगडमधील रायपूर- झारसुगडा विभागातील चौथ्या रेल्वे मार्गाच्या विद्युत जोडणीसाठी 21 ते 31 अगस्ट दरम्यान 10 दिवस 34 रेलवे गाड्या रद्द असताना आता पुन्हा 58 रेल्वे गाड्या 30 ते 5 सप्टेंबरपर्यंत रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप आणखी दहा दिवस वाढला आहे.


पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द
दरम्यान या कामामुळे पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यात 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान धावणारी पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, 1 आणि 2 सप्टेंबरची बिलासपूर-पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस, 2 आणि 3 सप्टेंबरची हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेस, 3 सप्टेंबरला सांतरागाछीहून पुण्यासाठी सुटणारी तर 5 सप्टेंबरला पुण्याहून सुटणारी सांतरागाछी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तसंच 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस महाराष्ट्र एक्स्प्रेस ही केवळ कोल्हापूर ते नागपूर दरम्यान धावेल, नागपूर ते गोंदिया धावणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.