गडचिरोलीः जिल्ह्यात पूरानंतर अनेक भागाचे सर्वेक्षण अद्याप झाले नाही आहे. तरी प्रशासनाने ज्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे पूर्ण करावे आणि बाधितांना वेळेत मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. त्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनाने जाहीर करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
बांधावर जाऊन केली पाहणी
विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी ते गडचिरोली दौऱ्यावर होते. यावेळी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी थांबून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसी संवाद साधला. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. गडचिरोलीपूर्वी त्यांनी शिवनी गावाजवळ बांधावर थांबून त्यांनी शेतकऱ्याची विचारपूस केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळणार, या दिशेने प्रशासनाने कार्य करण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले. पूरग्रस्त भागातील सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
अनेक भागातील कनेक्टिव्हीटी बाधित
जिल्ह्यात पुरामुळे अंदाजे 16300 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर ओसल्यानंतरही अनेक भागात जाण्यासाठी कनेक्टिव्हीटी नसल्याने पंचनामे संपायला किमान दोन आठवडे लागणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन सर्वप्रयत्न करत असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
मुलाखत आणि त्यावर उत्तर दिल्याने राज्यातील प्रश्न सुटणार नाही
लवकर अधिवेशन बोलवा अशी आमची मागणी होती. मात्र, ते ही बोलावले जात नाही आहे. त्यामुळे जशी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तशी मदत मिळताना दिसत नाही. माझी अशी एकीव माहिती होती की मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहे. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते, अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचं असतो. त्यामुळे आम्ही टीका करण्याचे कारण नाही. उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मुलाखत द्यायची आणि त्याला मग उत्तरे दिली जातात. यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती असल्याचा टोला यापूर्वी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारला लागावला होता.