Vidarbha Rain : मागील तीन ते चार दिवसात विदर्भात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला होता. यामुळं नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. तसेच वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. मात्र, सध्या विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यातही पुराचा धोका टळला आहे.  वैनगंगा नदी शांत झाली आहे. दरम्याम, गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. 


गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुलं वाहतुकीवर परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळं पार्लकोट इंद्रावती नदीला प्रचंड पूर आला होता. त्यामुळं भामरागड गावात पुराच्या पाण्याने शिरकाव केला होता. अनेक घरे पाण्याखाली आली होती. भामरागड गावाला बेटाच स्वरुप आलं होतं. मात्र, आता पूर पुर्णपणे ओसरला असून गावात पुरामुळं मोठया प्रमाणात चिखल पसरला असून ते काढण्याचं काम सुरू आहे. तर पार्लकोट नदीच्या  पुलावर देखील चिखल लाकूड असल्याने ते देखील साफ करण्याचं काम सुरू आहे. भामरागडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. 




78 तासानंतर वैनगंगा नदी सामान्य पातळीवर, मात्र, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा


अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी झाली शांत झाली आहे. पुराचे पाणी ओसरले आहे. नदीने आपली सामान्य पाणी पातळी गाठली आहे. मात्र, गोसेखुर्दचा अद्याप विसर्ग सुरु असल्याने नदी काठावरील गावांना इशारा दिला आहे. भंडारा जिल्हाला आलेला पुराचा धोका टळला असून, अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी शांत झाली आहे. दरम्यान, भंडारा आणि कारधा नदिला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पुलावरील पाणीही ओसरले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात या पुराचा 40 गावांना फटका बसला होता. तर 3 हजारच्यावर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली होती. मात्र,आता पूर ओसरल्याने हळूहळू सर्व स्थिती पूर्वपदावर येणार आहे. दरम्यान, पूर ओसरल्याने जिल्हा प्रशासनद्वारे युद्ध पातळीवर पंचनामे सुरु झाले आहेत. तसेच चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. तेथील स्थिती देखील पूर्वपदावर येत आहे.




पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता


दरम्यान, कोकण वगळता आजपासून (18 ऑगस्ट)  संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. परंतू, स्वच्छ सूर्यप्रकाश व पूर्णतः उघडीपीची शक्यता कमीच असल्याची माहिती यावेळी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं नद्या आणि कॅनॉल पात्रातील सततचा विसर्ग तसाच कायम ठेवावा लागणार आहे.   


महत्त्वाच्या बातम्या: