गडचिरोली: गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोसळणारा पाऊस आता थांबला आहे. मात्र सिरोंचा तालुका अद्याप पुराने वेढलेला आहे. मेडिकट्टा आणि गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा फटका  अहिरे तालुका आणि सिरोंचाला बसला होता. अहिरेमधील पूर स्थिती कमी झाली असली तरी सिरोंचा तालुक्यामध्ये अद्याप पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. 


गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे पूरस्थिती भयावह आहे. गेल्या चार दिवसांपासून सिरोंचा शहर चारही बाजूने पाण्याने वेढलेलं आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या पुराचा वेढा वाढत आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातील 34 गावे सिरोंचा तालुक्यातील आहेत.


गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या  नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. तर, पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासह 120 गावांचा जिल्हा मुख्यालयांशी संपर्क  तुटल्याचीही माहिती मिळत आहे.


जिल्हाधिकाऱ्यांची भेट
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामुळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले होते. याच धर्तीवर प्रशासनाकडून पूरबाधित क्षेत्रात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी आणि पुरामूळे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा येथे भेट दिली. 


यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाच्या नियोजनाबाबत आढावा घेतला आणि पुरबाधित क्षेत्राची सिरोंचा येथे पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तातडीने पंचनामे करावेत असे आदेश तालुका प्रशासनाला दिले. पुरानंतर येणारे जलजन्य आजार, साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी सूचना त्यांनी केल्या. गावातील पाण्याचे स्त्रोत निर्जंतुक करून आरोग्यविषयक गावोगावी तपासण्या राबविण्याच्या सूचना केल्या. जिल्हा प्रशासनाकडून काही प्रमाणात आवश्यक साहित्य पुरबाधितांना देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी  नागरिकांना आवश्यक मदत हवी त्या ठिकाणी तातडीने मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. गरोदर मातांची तपासणी, ईलेक्ट्रीसीटी पुर्ववत करणे, दूरध्वनी सेवा कार्यान्वित करणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.