गडचिरोली : नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी त्यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे.
नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमधील टेबलवर महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेल्या फाईल ठेवून एक अधिकारी दारू ढोसत होता. त्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान तो अधिकारी चामोर्शी येथे उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या निलंबनाच्या आदेशाचे शासनाचे पत्र गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले.
बारमध्ये फाईलवर सह्या करताना सीसीटीव्ही समोर
नागपुरात रविवारी एका बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स क्लिअर करण्याचं काम सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. याच प्रकरणाचा आता सीसीटीव्ही पुरावाही समोर आला आहे.
सीसीटीव्हीत दिसणारी सरकारी फाईल्स या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा अधिकारी या फाईल्स नागपूरच्या कीर्ती बारमध्ये घेऊन बसल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
एबीपी माझाच्या बातमीनंतर कारवाई
एबीपी माझाने या संबंधित बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि या सगळ्या प्रकरणात चौकशी सुरू झाली. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर आता या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: