Continues below advertisement

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीतील राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपवर (BJP) मोठा आरोप केला. मला पाडण्यासाठी भाजपने पाच कोटी रुपये देऊन पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातील अहिरेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी केला. आगामी निवडणुकीत भाजपला एकही जागा देणार नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीतील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात कुणी किती जागा लढवायच्या आणि कुणाला किती जागा द्यायच्या हे मी ठरवणार असं आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. येत्या निवडणुकीत अहिरेत फक्त घड्याळच चालेल असंही ते म्हणाले.

Continues below advertisement

Dharamrao Baba Atram : नेमकं काय म्हणाले धर्मराव बाबा आत्राम?

माझ्या मतदारसंघात कोण किती जागा लढल्या पाहिजे आणि कुणाला किती जागा दिल्या पाहिजेत हे मी ठरवणार. माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभं केलं. मला हरवायला भाजपने 5 कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या क्षेत्रात फक्त घड्याळच चालेल. एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही.

Aheri Assembly Constituency : विधानसभेत धर्मराव बाबा आत्राम यांची बाजी

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर शरद पवार गटाच्या उमेदवार आणि आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचे आव्हान होतं. तर धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे राजे अंबरीशराव आत्राम हे देखील निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे होते.

अहेरी मतदार संघात कौटुंबिक सामना रंगला होता. या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांना 53,978 मते मिळाली. तर त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35,569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37,121 मते घेतली.

2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे त्यावेळचे उमेदवार अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता.

ही बातमी वाचा: