गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा काल गडचिरोलीमधील अहेरीत दाखल झाली होती. या यात्रेतील सभेत बोलातना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महायुतीच्या सरकारनं सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थित जनतेला दिली. गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम हे सध्या अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडत नाही. आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केलीय, असं अजित पवार यांनी सांगितलं. 


अजित पवार काय म्हणाले?


आम्ही आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी इतरांना शिकवलं आहे. वस्ताद त्याच्या हाताखाली शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही. वस्ताद एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूकभूल करु नका, तुमच्या वडिलांसोबत राहा. वडील लेकीवर प्रेम करतात तेवढं प्रेम लेकीवर करु शकत नाही, असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही, आम्ही अनुभव घेतलेला आहे, मी चूक मान्य केली. वस्तादांनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो दाखवायची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी हा इशारा धर्मारावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना दिला. 


अजित पवार यांच्यांकडून सरकारच्या योजनांची माहिती


आदिवासी विकासासाठी राज्य सरकारनं १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात आदिवासी समाज विखुरला गेला आहे आणि त्या आदिवासी समाजाला इतरांबरोबर पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर राज्यभरातील माझ्या मायमाऊली भगिनींना होत आहे. आम्ही अनुसूचित जातीसाठी बार्टी, मातंग समाजासाठी आर्टी, बहुजन समाजासाठी सारथी, ओबीसी समाजाकरता महाज्योती, अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी आणि आदिवासी समाजाकरता टार्टी संस्था काढलेल्या आहेत. याशिवाय मुलींना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, तीन गॅस सिलिंडर मोफत यांसारख्या सवलती आम्ही देऊ केल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज बिलं आम्ही माफ केली आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाला विसरु नका, असं अजित पवार म्हणाले.  


इतर बातम्या :


Chhagan Bhujbal : हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढा, भुजबळांचं जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज


Arjun Khotkar : तुमचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून आम्ही युती धर्म पाळतोय, अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्ष टीका