नागपूरः दररोज रुग्ण संख्येचा आलेख झपाट्याने वाढत असल्याने मनपा प्रशासन अलर्ट मोडवर असून शनिवारी शहरात 33 पॉझिटिव्ह बाधितांची नोंद झाली तर ग्रामीणमध्ये 21 बाधितांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याबाहेरील 2 बाधितांचा समावेश आहे. यासह शहरातील सक्रिय बाधितसंख्या 297 वर पोहोचली आहे.
पूर्वी शहरापुरताच मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीणमध्येही पसरायला लागला आहे. शुक्रवारीतर तब्बल 113 दिवसानंतर रुग्णसंख्या पहिल्यांदाच 61 वर पोहोचली. यात शहरातील 34 आणि ग्रामीणमधील 26 तर जिल्ह्याबाहेरील 1 रुग्णाचा समावेश होता. नागपूर जिल्ह्यात तिसरी लाट जानेवारी महिन्यात आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच ओसरायला लागली. 23 फेब्रुवारी रोजी 68 रुग्णांची नोंद झाल्यानंतर मार्च महिन्यात 37च्या आत आणि एप्रिल महिन्यात व मे महिन्यात 6च्या आत रुग्णसंख्या होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येचा ग्राफ वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारपर्यंत 2641 चाचण्याच्या तुलनेत 2.3 टक्के पॉझिटिव्ह आले आहे.
17 दिवसांत 442 रुग्ण
फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच 11 जून रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या 55वर गेली असताना सहा दिवसात यात पुन्हा वाढ होऊन आज 61वर पोहोचली आहे. मागील 18 दिवसात 442 रुग्णांवर भर पडली आहे. सरासरी रोज 26 रुग्ण आढळून येत आहेत.
या महिन्यात 169 रुग्ण बरे
1 ते 17 जून दरम्यान 169 रुग्ण बरे झाले आहेत. यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजेच 43 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 5 लाख 67 हजार 652 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात 189 आणि ग्रामीणमध्ये 106वर तर जिल्ह्याबाहेरील 1 असे एकूण 297 रुग्ण सक्रीय आहेत. यातील 3 रुग्ण मेडिकलमधअये भरती असून 293 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
रविवारी लसीकरण केंद्र बंद
उद्या रविवार असल्याने शहरातील लसिकरण केंद्र बंद राहणार असल्याचे मनपाच्यावतीने कळविण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.