मुंबई : देशभर महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात संत यादवबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अण्णांनी मौनव्रत धारण केलं. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अण्णांनी मौन धारण केलं आहे. आरोपींना फाशी दिली नाही तर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देखील अण्णांनी दिला आहे.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या गावात असलेल्या राळेगणसिद्धी येथे साडेअकरा वाजता मौन आंदोलन सुरू केले आहेत. 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी अण्णांनी हे मौन धारण केले आहे. सरकार कडून कडक कायदे होत नाहीत आणि न्यायालयातील रिक्त पद भरली जात नाहीत त्यामुळे आरोपींना शिक्षा मिळण्यास उशीर होत असल्याचे अण्णांनी म्हणले आहे. इतकेच नाही तर सरकारची महिलांच्या बाबतची संवेदनशीलता कमी झाल्याचा आरोप देखील अण्णांनी केलाय. आता तरी सरकारला जाग यावी आणि निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी अण्णांनी आजपासून मौन आंदोलन सुरू केले आहे. जर प्रशासनाने आरोपींना फाशी दिली नाही तर पुन्हा एकदा प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे इशारा देखील अण्णांनी दिला आहे.

अण्णा हजारे म्हणाले, न्याय मिळेत नसेल तर आंदोलन करणे गरजेचे आहे. आंदोलन करताना हिंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अहिंसाच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे. मी गेले 35 वर्षापासून आंदोलन केले आहे. 2011 च्या आंदोलनात एकही दगड फेकला गेला नाही, अशाप्रकारे आंदोलन झालं पाहिजे.

दिल्लीमध्ये निर्भयाच्या घटनेमध्ये २०१३ मध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर आतापर्यंत या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही आजपर्यंत आरोपींना फाशी झालेली नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात महिला अत्याचारासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा मिळेपर्यंतची प्रक्रिया या जलद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीत आपण मौन व्रत आंदोलन सुरू करीत आहोत, असे अण्णा हजारे म्हणाले.