भंडारा : आजपर्यंत आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचा सोहळा पाहिला असेल पण भंडारा जिल्ह्यात चक्क शेतकऱ्याचा निवृत्ती सोहळा साजरा झाला आहे. हे ऐकून सुखद धक्का बसला ना पण हे खरं आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी गावात एका शेतकऱ्याच्या निवृत्ती सोहळ्याचे आयोजन त्यांच्या मुलांनी केले होते.


भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मोहगाव (देवी) येथे 19 सदस्यांच्या एकत्र कुटुंबात राहणारे गजानन काळे यांना 60 वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीसेवेतून कुटुंबाने निवृत्ती दिली. सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती म्हणजे सोहळा असतो. मग शेतकऱ्याची निवृत्ती जोरदार साजरी का करू नये, या कल्पनेतून गजानन यांचे भाऊ यशवंत, मुले चंद्रशेखर, संजय, रमेश आणि प्रकाश यांनी गजाननरावांच्या अहोरात्र कष्ट करून केलेल्या शेतीसेवेचा सन्मान करायचे ठरवले. शेतावर नुसता सेवनिवृत्तीचा सोहळा झाला असे नाही तर ढोल-ताशांच्या गजरात आप्तेष्टांनी वाजत गाजत सजवलेल्या बैलगाडीवरून त्यांना सन्मानाने घरी आणले. शेतकऱ्याची ही निवृत्ती अनोखी ठरली.

गजानन काळे म्हणाली, 60 वर्षे शेतीमध्ये पूर्णतः गुंतून गेलो होतो. आयुष्यात खूप चढ-उतार आले. निसर्गाशी दोन हात करण्याची हिंमत वाढतच गेली. आयुष्यभर मी शेतीत राबलो,अजूनही शेतीपासून दूर जाण्याची मनात इच्छा होत नाही. मात्र, एकीकडे मुले हा सर्व कारभार सांभाळणार म्हणून आनंद आणि दुसरीकडे आता शेतीतून निवृत्ती स्वीकारल्यामुळे दु:खही होत आहे.

आपल्या वडिलांनी आयुष्य भर केलेल्या कामाची कृतघ्न भेट म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे गजानन काळे यांच्या मुलांनी सांगितले आहे. आज विभक्त कुटुंब पद्धतीचा वाढता प्रभाव बघता एकत्र राहून गजानन काळे यांच्या आयुष्य भर केलेल्या कामाची पोच पावती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाने सेवानिवृत्त शेतकरी गजानन काले गहिवरले असून नवीन पीढीने यातुन आदर्श घ्यावा हीच उपस्थितांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाला सुरुवात