मुंबई : अभिनेत्री रविना टंडन, निर्माती, दिग्दर्शक फराह खान, कॉमेडियन भारती सिंह यांनी ख्रिश्चन समाजाविषयी अपमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविना टंडन, फराह खान, भारती सिंह यांनी एका कार्यक्रमामध्ये एका शब्दाचा खालच्या पातळीवर वापर केला. या शब्दाला ख्रिश्चन समाजांमध्ये मोठी प्रतिष्ठा आहे. मात्र त्यांनी त्याचा अश्लील भाषेत त्याचा वापर केला, असा आरोप करत अल्फा ओमेगा या संघटनेने निषेध केला. तसेच या कलाकारांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.


एका कार्यक्रमाचे मागच्या आठवड्यात प्रक्षेपण झाले होते. या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता देशभरातून होत असताना बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये या कलाकारांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात कलाकारांना अटक नाही झाली तर त्यांना आम्ही घराच्या बाहेर निघू देणार नाहीत, असा इशारा अल्फा ओमेगा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

माहितीनुसार रवीना, फराह आणि भारतीने एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देशभरात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात त्यांनी वापरलेले शब्द धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका चॅनेलवर हा भाग ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला.

रविना टंडन सध्या टीव्ही चॅनलवर काही कार्यक्रमांचे परीक्षण करताना दिसून आली होती. हिंदी चित्रपट क्षेत्रात 90 च्या दशकात रविनाचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या सौदर्याने अनेकांना घायाळ करणारी रविना आता चांगलीच अडचणीत सापडली आहे.

तर भारती सिंह ही प्रसिद्ध कॉमेडियन आहे. सध्या ती कॉमेडी नाईट विथ कपिल शर्माच्या शो मध्ये दिसून येत आहे. तर फराह खान हिने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच ती नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. तिने काही सिनेमांचे दिग्दर्शन देखील केले आहे.