कल्याण : कल्याणमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामागे स्थानिक आमदारांचं कारस्थान असल्याचा आरोप नगरसेवकाने केल्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. महेश गायकवाड असं नगरसेवकाचं नाव असून ते कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक आहेत.


महेश गायकवाड यांच्या प्रभागात सुरु असलेलं केबलचं खोदकाम त्यांनी थांबवलं होतं. त्यानंतर महेश गायकवाड यांनी कामगारांना मारहाण करत खंडणी मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केल्याने त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्याविरोधात कारस्थान रचून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला.


गणपत गायकवाड यांनी मात्र हे आरोप फेटाळत खोदकाम थांबवणं हे नगरसेवकाचं नव्हे, तर महापालिकेचं काम असल्याचं सांगितलं. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात राजकीय वैमनस्य असून विधानसभा निवडणुकीत महेश गायकवाड यांनी शिवसेना बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे या प्रकरणाची सध्या कल्याणमध्ये चर्चा सुरू आहे.