नागपूरः परिसरातील कुत्री पकडण्यासाठी महानगरपालिकेला अनेक वेळा अर्ज देऊनही तसेच स्मरणपत्र देऊनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाला अखेर रविवारच्या घटनेनंतर जाग आली. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नागपूर महानगरपालिकेचे पथक दाखल झाले आणि परिसरातील सात कुत्री पकडली. रविवारी मेडिकलमध्ये दोन डॉक्टरांचे लचके कुत्र्यांनी तोडून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


कारवाईनंतरही पुढील तिन दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. दोन वैद्यकीय डॉक्टरांवर मेडिकल परिसरात कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतला. या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तावर चर्चा सुरू झाली. रात्रीच्यावेळी मेडिकल परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा हैदोस पसरला असतो. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. महापालिका प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र मेडिकलमध्ये मागील दोन वर्षांत कोणताही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार मार्डतर्फे करण्यात आली. 2019 ते 2022 या कालावधीत भटकी कुत्री तसेच इतर चाव्याची 4 हजार 300 प्रकरणे मेडिकलमध्ये नोंदवली आहेत. तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे.


मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण


2020 - दोन हजार 178 प्रकरण
2021- एक हजार 305 प्रकरण
2022- 723 प्रकरण (मार्च 2022 पर्यंत)


इंजेक्शनचीही उपलब्धता नव्हती


मेडीकलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून त्यांचे नातेवाईकही परिसरातच झाडाच्या खाली, आणि मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर असतात. तर अनेक भरती रुग्णांचे नातेवाईक झोपतातही त्यामुळे अशा घटना रोजच्याच असल्याचे व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले. मेडिकलमधील दोन डॉक्टरांचा चावा रविवारी सायंकाळी कुत्र्यांनी घेतला. यातील एक निवासी तर एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे. कुत्र्यांचा हल्ला एवढा भयंकर होता की हात आणि पायावर खोलवर जखमा झाल्या. नखांनी ओरबाडले. भयभीत झालेल्या डॉक्टरांनी कॅज्युल्टी गाठली पण धक्कादायक बाब म्हणजे येथे इंजेक्शन उपलब्ध नव्हते. डॉक्टरांनी पैसे गोळा करून इंजेक्शन बोलावले, यानंतर उपचार करण्यात आल्याची माहिती पुढेल आली आहे.


पंधरा दिवसात चार डॉक्टरांना चावा


या पंधरा दिवसात चार डॉक्टरांना चावा घेतल्याची माहिती मेडिकलच्या मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांनी दिली. या संदर्भात मेडिकल प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु, निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे प्रशानस दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार मार्डतर्फे करण्यात आली. दोन्ही डॉक्टरांना सध्या मेडिकलमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


Nagpur : मेडिकलमधील दोन डॉक्टरांवर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले