Rice Price in India : देशात गव्हानंतर आता तांदळाच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तांदळाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तांदळाच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. जून आणि जुलै महिन्यामध्ये तांदळाच्या किंमतीत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. साध्या तांदळासह, बासमती तांदूळ आणि तुकडा बासमती तांदूळ यांच्या दरातही वाढ झाली आहे. 25 रुपये किलोने मिळणारा तुकडा तांदूळ 30 ते 35 रुपये किलो दराने मिळत आहे. साध्या तांदळाच्या किमतीही वाढल्या आहेत.


भाताचं उत्पादन घटलं


भारतात यावर्षी धान्य उत्पादनात घट झाली आहे. जुलै महिन्याच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये तांदूळ उत्पादनामध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भात उत्पादनात 13.3 टक्क्यांनी घट झाली आहे. 


बासमती तांदूळ महागले


बासमती तांदळाचे (Basmati Rice) दर 60 रुपये किलोवरून 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तुकडा बासमती तांदूळ (Broken Basmati Rice) 30 रुपये किलो ऐवजी 40 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. ईशान्येकडील सहा राज्यांतील भातपिकाखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 37.70 लाख हेक्टरने घट झाली आहे. तांदूळ उत्पादनात 100 लाख टनांची घट झाली आहे.


तांदळाच्या निर्यातीत 27 टक्क्यांनी वाढ 


भारताने 2021-22 या वर्षात जगातील 150 हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात केला. यापैकी 76 देशांमध्ये एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये 2015 दशलक्ष डॉलर किमतीच्या तांदळाची निर्यात झाली होती. ही निर्यात 2020-21 मध्ये 4799 दशलक्ष डॉलर आणि 2021-22 मध्ये 6115 दशलक्ष डॉलर इतकी वाढली आहे. 2021-22 मध्ये बिगर बासमती तांदळाची निर्यात 27 टक्क्यांनी वाढली.


निर्यातदारांची प्रतिक्रिया


अखिल भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष विजय सेटिया यांनी यंदा तांदळाची निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सेतिया यांनी सांगितलं की, बांगलादेश हा भारतीय तांदळाचा कायमस्वरूपी ग्राहक नाही. भात बांगलादेश येथील प्रमुख अन्न आहे. भाताचे पीक चांगलं आल्यावर बांगलादेश तांदूळ आयात करत नाही, भात उत्पादन चांगलं झालं नाही तरच तो भारताकडून तांदूळ आयात करतो. यंदा बांगलादेशातून तांदळाची मागणी आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारनेही तांदळावरील आयात शुल्क कमी केलं आहे. परिणामी भारतीय बाजारपेठेत तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.


'या' राज्यांमध्ये केली जाते भात शेती


भात भारतातील प्रमुख अन्न आहे. ज्या राज्यांमध्ये तांदूळ जास्त खाल्ला जातो, तिथे त्याचं पिकही जास्त घेतलं जातं. पंजाब आणि हरियाणा याला अपवाद आहेत. या राज्यांतील मुख्य अन्न चपाती (Roti) आहे, परंतु अधिक पैसे कमावण्यासाठी तेथील शेतकरी भातशेती करतात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि हरियाणा ही भारतातील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्य आहेत.