Fashion : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी अनेक दिग्गजांनी या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती. गेल्या काही दिवसांपासून अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू होते. या दरम्यान अंबानी कुटुंब, नववधू राधिका यांनी परिधान केलेले फॅशन ट्रेंड चर्चेत होते. एकापेक्षा एक आऊटफिट्स, त्यांची थक्क करणारी किंमत, विविध दागिन्यांमध्ये ही मंडळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होती. मग लाडक्या लेकाच्या लग्नाच्या दिवशी ही मंडळी कशी मागे राहील? लग्नात नववधू राधिकाने तर सोन्याचा लेहंगा परिधान केल्याने सर्वांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. जाणून घेऊया या सोन्याच्या लेहेंग्याची काय खासियत आहे. आणि किंमत काय आहे?



अंबानींच्या धाकट्या सूनेचा शाही अंदाज.. सोन्याचा लेहंग्याची सर्वत्र चर्चा


नववधू राधिका मर्चंटने तिच्या लग्नाच्या दिवशी  मिरवणुकीपासून ते लग्न समारंभापर्यंत अतिशय सुंदर लेहेंगे आणि दागिने परिधान केले होते. तिने तिच्या पाठवणीच्या दिवशी घातलेला लेहेंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. अंबानींची धाकटी सून लाल रंगात शाही दिसत होती, लाल रंग हा वैवाहिक आनंदाचे लक्षण मानले जाते. तिच्या गळ्यात पाचू आणि हिरे जडवलेल्या हाराने तिचे रुप आणखीनच खुलले होते. सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या या फोटोंवर लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. राधिकाचा लग्नाचा लूक सगळ्यांनीच पाहिला, पण अंबानी झाल्यानंतर माहेराला निरोप देताना राधिकाचा लेहेंगा खरोखरच पाहण्यासारखा होता.





मनीष मल्होत्राने तयार केला खास लेहेंगा 


मनीष मल्होत्राने राधिकासाठी हा सुंदर लाल लेहेंगा तयार केला आहे. या सेटमध्ये, लेहेंगामध्ये मल्टीपल पॅनल्स जोडले गेले आहेत, बनारसी ब्रोकेडने बनवलेल्या या लेहेंग्यावर सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे रंग टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा अर्थ असा की प्रकाशात कधी लालसर रंग दिसेल, कधी नारिंगी तर कधी पिवळा.





सोन्याच्या तारेचे भरतकाम


राधिकाचा लेहेंगा रॉयल दिसण्यामागील आणखी एक कारण म्हणजे त्यावर केलेली गोल्डन एम्ब्रॉयडरी. हाय नेक आणि फुल स्लीव्ह ब्लाउजमध्ये खऱ्या सोन्याच्या तारांनी पारंपारिक कारचोबी भरतकाम केले होते. त्याची कारागिरी 19 व्या शतकातील गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेल्या टाक्यांवरून प्रेरित होती. लेहेंग्यासह सोनेरी चोली खूपच सुंदर दिसत होती. पलेहेंगाची चोळी बॅकलेस ठेवत, दोन्ही बाजू एकाच फॅब्रिकच्या तीन पट्ट्यांनी जोडल्या गेल्या. यावरही सोन्याचे काम झाले. राजेशाही लूक खुलून दिसण्यासाठी, राधिका अंबानीने तिच्या डोक्यावर सुंदर गुलाबी नक्षी असलेला बनारसी दुपट्टा घातला होता. ज्यामुळे राधिका एक स्वप्नातील राजकुमारी प्रमाणे भासत होती


 





कोट्यवधींच्या दागिन्यांमध्ये दिसली राधिका


नववधूचा लुक पूर्ण करण्यासाठी राधिका अंबानीने कुंदन बेस आणि पोल्कीने सजवलेला चोकर नेकलेस घातला होता. यासोबतच तिने हिरा आणि पाचूने बनवलेला खूप महागडा हारही घातला होता. तिची मोठी बहीण अंजली मर्चंटनेही तिच्या लग्नात हा लांब नेकपीस परिधान केला होता. राधिकाच्या हातात हिऱ्याच्या बांगड्या  होत्या. सेटवर मॅचिंग डँगलर त्याच्या कानात दिसले. केस मधोमध भाग करून अंबाडा बांधून त्यावर गजरा सजवला होता. यासोबत मांगटिकालाही केसांमध्ये सजवले होते. राधिकाचा मेकअप नॅचरल टोन ठेवून, डोळ्यांना हलक्या स्मोकी टचने आणि कपाळाला बिंदीने अधिक सुंदर बनवले होते.





राधिका आणि अनंत अंबानी यांची प्रेमकहाणी 2017 साली सुरू झाली होती


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना आता अधिकृतपणे त्यांची धाकटी सून मिळाली आहे. लग्न आणि नंतर निरोपाचे विधी पूर्ण केल्यानंतर राधिका मर्चंटने तिच्या माहेराला निरोप देत पती अनंत अंबानीच्या घरी राहण्यास गेली आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची प्रेमकहाणी 2017 साली सुरू झाली होती आणि आता दोघेंही पती-पत्नी झाले आहेत. 12 जुलै 2024 रोजी वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची धाकटी मुलगी राधिका नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची सून झाली आहे. 


 




हेही वाचा>>>


Fashion : लग्न भावाचं, जलवा मात्र लाडक्या बहिणीचा! ईशा अंबानीचा 'हा' लेहेंगा बनवायला लागले हजारो तास, किंमत वाचून व्हाल थक्क! 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )