मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पाच दिवसांनंतरही या संपावर तोडगा निघू शकलेला नाही. बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक घटल्याने भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत.


महाराष्ट्र बंदनंतर शेतकऱ्यांनी राज्यातील विविध सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले.

  • सोलापूर : बार्शीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी स्मशानात आंदोलन केलं. सरकारचं प्रतिकात्मक सरण रचून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा अंत्यविधी करण्यात आला.

  • नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये पवारांनी महाराष्ट्रातील शेतकरी संप, कर्जमाफीबद्दल चर्चा केली.

  • नाशिक : आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ ओस पडलेली दिसून आली. कारण शेतकरी संपामुळे लासलगाव बाजार समितीत 100 कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे

  • वसई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फायदा परराज्यातील शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. कारण राज्यातील भाजीपाल्याची आवक घटल्याने परराज्यातील भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.

  • नाशिक : शेतकरी संपात ग्रामीण अर्थकारण संकटात आलं आहे. कारण 100 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल थांबली आहे. शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजंदारी बुडाली आहे. 17 मोठ्या बाजार समिती आणि 20 उपबाजार समितीत रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला आहे. भविष्यात निर्यातीवर आणि भावांवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

  • सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

  • कोल्हापूर - रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने शिये येथील तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं.

  • मनमाड- चांदवड तालुक्यातील रायपूर येथे शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यलयाला टाळे ठोकले.

  • पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी सहा वाजेपर्यंत 657 वाहनांमधून सुमारे 50 टक्के भाजीपाला आणि फळांची आवक झाली.

  • शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. नाशिकमध्ये बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर शंभर रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. सहाव्या दिवशीही संपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने, बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत.