अमरावती : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून तक्रार ऐकायला मिळते, ती म्हणजे बियाणे बोगस निघाले, शेतातील पीक नष्ट झाले किंवा बियाणे उगवलेच नाहीत, या सर्व समस्या पाहून आता शेतकऱ्यांनीच बियाणे तयार करण्यास सुरुवात केली आणि स्वतःचं बीज प्रक्रिया केंद्र सुरु केलं आहे .

अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात दोन हजार शेतकरी एकत्रित आले. कृषी समृद्धी उत्पादक कंपनी स्थापन करुन, त्या माध्यमातून यंदा बीज उत्पादन कर्यक्रम हाती  घेतला.

सुरुवातीला दोन हजार एकरावर बीज उत्पादन केले. उत्पादनातील मालाला भाव मिळावे म्हणून स्वतः शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केंद्र उघडले. यामध्ये शेतकऱ्यांनीच त्यांच्या मालाचे ग्रेडिंग व प्रसेसिंग केली. त्यानंतर थेट बाजारात माल उपलब्ध करुन दिला.

शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीकडे आज 6 हजार पोती सोयाबीन, 5 हजार पोती चणा, एक हजार पोती मुग, एक हजार पोती उडीद उपलब्ध आहेत. आता जेव्हा शेतकऱ्यांना बियाण्यांची गरज भासेल, त्यावेळी शेतकऱ्यांची ही कंपनी बियाणे उपलब्ध करुन दिलं जाईल.

शेतकऱ्यांच्या कंपनीने आता 10 हजार क्विंटलवर बीज प्रकियाही केली असून, हजारो शेतकऱ्यांच्या मालाचे ग्रेडिंग केली आहे.

या केंद्रमुळे आम्हाला फायदा झाला असून, आम्हाला वेळ लागत होता, त्या पेक्षा कमी वेळ या ठिकाणी लागत असल्याने याचा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात.

जर शेतकऱ्यांनी साधे धान्य विकले, तर त्याला एक क्विंटलमागे 5 हजार 500 रुपये मिळतात. मात्र, जर तेच धान्य प्रक्रिया करुन बीज म्हणून विकले, तर नक्कीच दुप्पट फायदा शेतकऱ्याला होतो.

शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी बँकेकडून 10 लाख रुपये, तर 10 लाख रुपये हे कृषी विभागाने अनुदान दिले.