मुंबई : मेट्रो 2 आणि मेट्रो 7 च्या विस्तारानंतर आता मेट्रो 4 चाही विस्तार होणार आहे. राज्य सरकारने याबाबत घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडच्या नागरिकांना थेट सीएसटीपर्यंत मेट्रोनं प्रवास करणं शक्य होणार आहे.

बहुचर्चित वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या मेट्रो 4 चा पल्ला वाढवण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. मेट्रो 4 आती सीएसटीतील जीपीओपर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजेच मेट्रो 4 चा मार्ग आणखी 10 किलोमीटरने वाढणार आहे.

मेट्रो 4 कुठून कुठपर्यंत वाढणार?

वडाळ्यापासून सुरु होणारी मेट्रो आता थेट सीएसटी रेल्वे स्थानकाजवळच्या जीपीओपर्यंत नेली जाईल. यामुळे मेट्रो 4 चा मार्गात वडाळा ते जीपीओ असा सुमारे 10 किमीचा पल्ला वाढला आहे. हा मार्ग हार्बर रेल्वे मार्गाला समांतर पी डिमेलो मार्गावरुन जाणार आहे. तर दुसरीकडे घोडबंदर मार्गावर कासारवडवलीपर्यंत असलेली मेट्रो 4 ही गायमुखपर्यंत 5 किमीने अंतर वाढवली जाणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील आणखी मोठ्या लोकवस्तीला या मेट्रोचा फायदा होईल.

मेट्रो 4 चा मार्ग दोन्ही बाजूंनी वाढवला गेला असल्यानं थेट ठाणे ते सीएसटी असा मेट्रो प्रवास भविष्यात शक्य होणार आहे.

मेट्रो 4 च्या प्रकल्पाचा मूळ खर्च सुमारे 14 हजार 500 कोटी रुपये होता. मार्ग वाढवल्याने खर्च आणखी 5 हजार कोटी रुपयांनी वाढणार आहे. पण ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मेट्रो 4 च्या नव्या मार्गाचा प्रकल्प आराखडा काही दिवसांत निश्चित होणार असून, डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मेट्रो 4 चं भूमिपूजन 20 डिसेंबर 2016 ला पंतप्रधानांनी केले आहे.